महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आता पोलिस अधिकारी; पाहा कुठं झालंय पोस्टिंग?

DYSP-Vijay-Chaudhari
DYSP-Vijay-Chaudhari

पुणे : पोलिस दलात दाखल झाल्यानंतर आजही तालमीमध्येच राहून कुस्तीचा सराव करणारे 'ट्रिपल' महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी हे नुकतेच पुणे पोलिस दलाच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून रुजू झाले. पोलिस दलातील कामाचा व्याप, कुस्तीचा दैनंदिन सराव सांभाळून 2020 च्या 'हिंद केसरी'साठीची तयारीही त्यांनी सुरू ठेवली आहे. 

मूळचे जळगावमधील चाळीसगाव तालुक्‍यातील सायगावचे असलेल्या चौधरी यांनी घरातील कुस्ती परंपरा पुढे चालू ठेवली. पुण्यातील कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलामध्ये 2008 पासून 'हिंद केसरी' पैलवान रोहित पटेल व पैलवान अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती खेळण्यास सुरवात केली. दरम्यान, राज्य सरकारने सलग तीनदा 'महाराष्ट्र केसरी' ठरणाऱ्या पहिलवानांना थेट पोलिस दलामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून विशेष नियुक्ती करण्याची घोषणा केली. त्यानुसार चौधरी यांनी सलग तीनदा 'महाराष्ट्र केसरी' किताब पटकाविल्यानंतर 'डीवायएसपी' म्हणून नियुक्ती झाली.

नाशिक येथील प्रशिक्षणानंतर चौधरी यांनी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण पोलिस दलात पोलिस उपअधीक्षक (डीवायएसपी) म्हणून काम सुरू केले. त्यांनी नांदेड सिटीजवळ स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्‍या व्यवसायाच्या ठिकाणी छापे घालून पहिली कारवाई केली. दरम्यान, त्यांची पुण्यामध्ये बदली झाली. गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात त्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर ते गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्तपदी रुजू झाले. पोलिस आयुक्त डॉ. के.वेंकटेशम, सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रोत्साहन दिल्याचे त्यांनी सांगितले. 

संतुलित आहार, कुस्तीचा नियमित सराव आणि 2020 च्या 'हिंद केसरी'मध्ये उतरण्याची तयारीही त्यांनी सुरू केली आहे. पहिलवान असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा असून त्याचा गुन्हे उघडकीस आणण्यासाठी त्यांना उपयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले. 'कुस्ती'मुळे लोकांकडून आदर, सन्मान मिळतो, असे सांगतानाच 'खेळामुळे वरिष्ठ पदापर्यंत जाता येते, हे मुलांना कळावे, यासाठी पोलिसाच्या गणवेषातच आपण विविध ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी जातो,' असेही चौधरी यांनी नमूद केले. 

'गदालोट' आवडीचा डाव 
कुस्तीमध्ये समोरच्या मल्लाला क्षणार्धात चकवा देणारा 'गदालोट' हा डाव आपली खासियत आहे. या डावाची धास्ती प्रतिस्पर्ध्यात अगोदरच भरलेली असते, असेही चौधरी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com