रसदार फळांवर हिवाळ्यातही ताव!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

कलिंगड, खरबूज, पपईला मागणी; महिनाभर आधीच द्राक्षे बाजारात

कलिंगड, खरबूज, पपईला मागणी; महिनाभर आधीच द्राक्षे बाजारात

पुणे - हिवाळ्यात रसदार फळांना सहसा मागणी कमी असते; पण कलिंगड, खरबूज, पपई, मोसंबी, संत्री, डाळिंब अशा रसदार फळांना सध्या बाजारात पुणेकरांकडून चांगलीच मागणी आहे. यात आता भर पडली आहे ती द्राक्षांची. महिनाभर आधीच द्राक्षे बाजारात आल्याने ते ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
द्राक्षाचा हंगाम कधी सुरू होतो, याची सर्वांनाच उत्सुकता असते. जानेवारी महिन्याच्या शेवटी हा हंगाम सुरू होत असला तरी यंदा द्राक्षाच्या हंगामाची प्रतीक्षा डिसेंबरमध्येच संपली आहे. समाधानकारक पावसामुळे पाण्याची उपलब्धता आणि पोषक वातावरण यामुळे यंदा द्राक्षे लवकर बाजारात आली आहेत. त्याचे ग्राहकांकडूनही स्वागतच होत आहे. लग्नसराई व समारंभासाठी द्राक्षांना सध्या चांगली मागणी असल्याचे दिसून येत आहे.

व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, ‘‘विक्रीसाठी दाखल झालेली द्राक्षे चवीला गोड आणि चांगल्या दर्जाची आहेत. त्यामुळे पुणेकरांबरोबरच अहमदाबाद, सुरत, बडोदा येथूनही द्राक्षांना मागणी आहे. मार्केट यार्डातील फळ विभागात सुमारे १५ ते १६ टन द्राक्षांची आवक झाली आहे. ती बारामती, सांगली भागांतून झाली आहे; पण येत्या पंधरा दिवसांत ही आवक मोठ्या प्रमाणात वाढेल.’’ 

कलिंगडाची आवक १० टन, खरबुजाची ५ टन, पपईच्या १३ गाड्या, मोसंबीची २५ टन, संत्र्याच्या ७०० पेट्या आवक झाली आहे. त्यामुळे फळांचे भाव स्थिर आहेत.

Web Title: Juicy fruit on the proposal winter