Grapes : जुन्नरमध्ये जम्बो द्राक्ष उत्पादकांना लाखोंचा फटका; बांगलादेशाने वाढविले आयात शुल्क

निर्यात होणाऱ्या द्राक्षावर बांगलादेशाने आयात शुल्कात जवळपास दुप्पट वाढ केली आहे. मागील हंगामात प्रतिकिलो ६६ रुपये आयात शुल्क होते.
Grapes
GrapesSakal

नारायणगाव - निर्यात होणाऱ्या द्राक्षावर बांगलादेशाने आयात शुल्कात जवळपास दुप्पट वाढ केली आहे. मागील हंगामात प्रतिकिलो ६६ रुपये आयात शुल्क होते. यंदाच्या हंगामात आयात शुल्कात वाढ करून प्रतिकिलो १०४ रुपये आयात शुल्क केले आहे. यामुळे निर्यातदार व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदी कडे पाठ फिरवली आहे. याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे.

जुन्नर तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या निर्यातक्षम जातीच्या जम्बो द्राक्षाला सध्या गुणवत्तेनुसार प्रतिकिलो ५० ते ७० रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळत आहे. कमी बाजारभावामुळे तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना या वर्षी एकरी तीन ते चार लाख रुपयांचा फटका बसला आहे. सध्याच्या बाजारभावात जम्बो उत्पादक द्राक्ष उत्पादकांचा जेमतेम भांडवली खर्च वसूल होत आहे.

तालुक्यात काळी व पांढऱ्या जातीच्या द्राक्षे लागवडी खाली सुमारे चार हजार एकर क्षेत्र आहे. या पैकी सुमारे साठ टक्के क्षेत्र जंबो, शरद सीडलेस, किंग बेरी या काळ्या रंगाच्या व मोठ्या आकाराच्या द्राक्ष लागवडीखाली आहे. बांगलादेशात जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान काळ्या रंगाच्या द्राक्षाला मोठी मागणी असते. राज्यात जुन्नर तालुका जम्बो द्राक्ष उत्पादनात आघाडीवर आहे. तालुक्यातून दरवर्षी सुमारे दीड हजार टन जम्बो व इतर काळ्या जातीची द्राक्ष बांगलादेशात निर्यात केली जातात.

दरम्यान, आयात शुल्क वाढीमुळे आर्थिक दृष्ट्या खरेदी-विक्रीचे गणित जुळत नसल्यामुळे देशातील व्यापाऱ्यांनी बांगलादेशात द्राक्ष निर्यात कमी केली आहे. याचा थेट परिणाम द्राक्षाच्या बाजारभावावर झाला आहे. सध्याच्या बाजारभावात जेमतेम भांडवली खर्च वसूल होत आहे. यामुळे केंद्र सरकारच्या निर्यात धोरणाबाबत शेतकऱ्यांमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.

पांढऱ्या द्राक्षाची अवस्था बिकट

थॉमसन सीडलेस,सोनाका,आर के या पांढऱ्या जातीची द्राक्ष व्यापारी खरेदी करत नाहीत. यामुळे प्रतिकिलोग्राम १० ते १५ रुपये या भावाने पांढरी द्राक्ष वाईन बनवण्यासाठी दिली जात आहेत.

बाजारभावात ५० टक्क्यांनी घट

बांगलादेशात एका कंटेनर मध्ये २२ टन द्राक्ष पाठवली जातात. मागील वर्षी आयात शुल्क ६६ रुपये प्रतिकिलोग्राम होते.एक कंटेनर निर्यात करण्यासाठी आयात शुल्क सुमारे तेरा लाख रुपये भरावे लागत होते. यावर्षी आयात शुल्क वाढल्याने २६ लाख रुपये भरावे लागत आहे. यामुळे द्राक्षाच्या बाजारभावात सुमारे ५० टक्के घट झाली आहे.

डीजे एक्स्पोर्ट कंपनीतर्फे थायलंड, मलेशिया, श्रीलंका या आशियाई देशात द्राक्ष निर्यात केली जात आहेत. मात्र, जानेवारी महिन्यात झालेल्या पावसामुळे सप्टेंबर छाटणीच्या द्राक्षामध्ये क्रॅकिंग आढळून येत आहे. कुलिंग करताना द्राक्ष काळी पडतात. त्यामुळे सध्या खरेदी कमी केली आहे.

- बिजू जोसेफ, व्यवस्थापक, डीजे एक्स्पोर्ट कंपनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com