जुन्नर, आंबेगावात बिबट्याची दहशत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

दोन शेळ्यांचा फडशा
टाकळी हाजी - कवठे येमाई (ता. शिरूर) येथील हिलाळ वस्तीवर दोन शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्या. शुक्रवारी रात्री बिबट्याने जाळीतून उडी मारून एक शेळी जागीच ठार मारली. दुसऱ्या शेळीला समोरच्या उसाच्या क्षेत्रात नेऊन ठार केले.

पारगाव - पहाडदरा घाटात शनिवारी रात्री दहाच्या सुमारास दोन बिबट्यांनी वाहनचालकांना दर्शन दिल्याने या परिसरात बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे.

अवसरी बुद्रुकवरून पहाडदरामार्गे लोणी व धामणीला जाण्यासाठी जवळचा मार्ग निर्माण झाला आहे. हा रस्ता दाट जंगलातून, डोंगरामधून जात असल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी आहे. 

या परिसरात बिबट्यासह अनेक वन्य प्राणी रस्त्यात नेहमी आढळतात. या परिसरात बिबट्यांना लपण्यास वाव आहे. या परिसरात अनेक बिबटे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शनिवारी अवसरी बुद्रुक येथे मोरे या शेतकऱ्याची शेळी बिबट्यांनी ठार केली. तसेच, दोन वाहनचालकांना बिबट्याने दर्शन दिले. 
याबाबत वनखात्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले, की या परिसरात बिबट्यास राहण्यास अनुकूल वातावरण असल्यामुळे वाहनचालकांनी रात्रीच्या वेळेस पहाडदरा घाटातून शक्‍यतो प्रवास टाळावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Junnar Aambegav Leopard