मुंबई- पुणेकरांनो, तुमच्या एका चुकीने गाव लागेल धक्‍क्‍याला... 

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 22 मे 2020

बाहेरगावाहून गावाकडे येणाऱ्यांनी स्वतःची, कुटुंबाची आणि आपल्या गावाची काळजी घ्यावी. आपल्या एका चुकीने आपल्या कुटुंबाला व गावाला त्रास होण्याची शक्‍यता आहे.

जुन्नर (पुणे) : बाहेरगावाहून गावाकडे येणाऱ्यांनी स्वतःची, कुटुंबाची आणि आपल्या गावाची काळजी घ्यावी. आपल्या एका चुकीने आपल्या कुटुंबाला व गावाला त्रास होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गावात जाण्यापूर्वी आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. 

तुमचे गाव कन्टेन्मेंट झोनमध्ये नाही ना...

जुन्नर तालुक्‍यात आजअखेर (ता. 22) होम क्वारंटाइन 11 हजार 587; तर संस्था क्वारंटाइनमध्ये 613 जण ठेवण्यात आले आहेत. यात मुंबई व पुणे येथून येणाऱ्यांची संख्या अधिक असून, यातील काही मंडळी होम क्वारंटाइनचा शिक्का असूनही खुलेआम फिरताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. कोरोना टेस्टसाठी नेण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये बाहेरगावाहून आलेल्या व्यक्ती मोठ्या प्रमाणात आहेत. 

कुरकुंभ येथील केमिकल साठ्याला आग

जुन्नर तालुक्‍यात 7 मेपासून दहा हजाराहून अधिक नागरिक आल्याची नोंद आहे. अवैध मार्गाने देखील लोक येत आहेत. लपूनछपून येताना छोटे मोठे अपघात देखील होत आहेत. बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांनी लपून राहू नये, घाबरून जाऊ नये, सरकारने आपली योग्य व्यवस्था केलेली आहे. याची खात्री बाळगावी व प्रशासनास सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे- मुंबई व इतर ठिकाणाहून येणाऱ्या आमच्या बांधवांनो आपण गावी येणार असाल; तर सरळ गावी न जाता प्रथम सरकारी दवाखान्यात जाऊन स्वतःची तपासणी करून घ्या, नंतरच गावात जावे. आरोग्य तपासणीनंतर नोटीसची वाट न पाहता स्वतःहून चौदा दिवस होम क्वारंटाइनचा व्हा. तशी सोय नसल्यास गावात संस्थात्मक क्वारंटाइन व्हा. गावचे ग्रामसेवक, तलाठी, मंडल अधिकारी, पोलिस पाटील, सरपंच, ग्रामसुरक्षा दल, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका ,आरोग्य सेवक, शिक्षक, सर्व शासकीय यंत्रणा आपल्या आरोग्यासाठी झटत आहेत. गावाकडे शहरासारखी पुरेशी आरोग्य सेवा उपलब्ध नाही, याची जाणीव ठेवून प्रशासनाच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: junnar- Appeal for a health check-up before coming to the village from the city