जुन्नरला अतिवृष्टीमुळे 27 कोटींचे नुकसान

grapes1
grapes1

पंचनाम्यानुसार आकडेवारी; तुटपुंज्या भरपाईमुळे निकष बदलाची मागणी

नारायणगाव (पुणे) : कृषी, महसूल व पंचायत समिती विभागाने केलेल्या पंचनामा अहवालानुसार ऑक्‍टोबरमधील अतिवृष्टीमुळे जुन्नर तालुक्‍यात जिरायती, बागायती क्षेत्रातील कडधान्य, तेलबिया व फळभाजीपाला पिकांचे 27 कोटी 40 लाख रुपयांचे नुकसान झाले. नुकसानीची ही रक्कम 13 मे 2015 च्या सरकारी निर्णयानुसार काढण्यात आली आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी दिली.


सन 2015 च्या सरकारी निर्णयानुसार काढण्यात आलेली नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. कारण, संकरित बियाणे, खते, कीटकनाशके, संप्ररके आदीच्या भावात मागील चार वर्षांत तीनपट वाढ झाली आहे. मजुरी, वीजबिल, डिझेल व यांत्रिक अवजाराने करण्यात येणाऱ्या मशागतीच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. यामुळे भांडवली खर्चाचा विचार करता ही नुकसानभरपाई तुटपुंजी असल्याचे मत अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघटनेचे अध्यक्ष श्रीराम गाढवे यांनी व्यक्त केले. वाढलेल्या भांडवली खर्चाचा विचार करून सरकारने सुधारित दराने भरपाई द्यावी, पीककर्ज माफ करून इतर कर्जांवरील व्याजात सवलत द्यावी, अशी मागणी गाढवे यांनी केली.


याबाबत शिरसाठ म्हणाले की, पंचनामा अहवालानुसार जिरायती, बागायती, भाजीपाला व फळपिकांचे अनुक्रमे 15 हजार 866 हेक्‍टर, 10 हजार 42 हेक्‍टर, 1 हजार 615 हेक्‍टर, असे एकूण 27 हजार 523 हेक्‍टर क्षेत्रातील उभ्या पिकांचे तेहतीस टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांची संख्या एकूण 56 हजार 513 आहे. सन 2015 च्या सरकारी निर्णयानुसार जिरायती, बागायती भाजीपाला व फळपिकांना हेक्‍टरी अनुक्रमे 6 हजार 800 रुपये, 13 हजार 500 रुपये, 18 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येते.


सुमारे 735 हेक्‍टर क्षेत्रातील द्राक्ष, तर 432 हेक्‍टर क्षेत्रातील डाळिंबपिकांचे नुकसान झाले आहे. द्राक्षबागांना हेक्‍टरी सुमारे सहा लाख रुपये, तर डाळिंबाला हेक्‍टरी सुमारे अडीच लाख रुपये खर्च येतो. सरकारी निर्णयानुसार या दोन्ही पिकांना हेक्‍टरी अठरा हजार रुपये (एकरी सात हजार दोनशे रुपये) भरपाई दिली जाते.
 

"द्राक्ष उत्पादकांना एकरी पन्नास हजार द्या'
वास्तविक, अतिवृष्टीच्या कालावधीत द्राक्षबागांना चाळीस ते पन्नास वाढीव फवारण्या कराव्या लागल्या आहेत. प्रत्येक फवारणीला एकरी दोन हजार रुपये खर्च झाला. केवळ फवारणीसाठी ऑक्‍टोबरमध्ये पन्नास ते साठ हजार रुपयांचा खर्च द्राक्षबागांवर झाला. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना एकरी किमान पन्नास हजार रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी शिवतेज फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष सतीश पाटे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com