रेमडेसिव्हीरनंतर आता प्लाझ्माचाही काळाबाजार; 24 तासांत 200 पेशंट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patient

रेमडेसिव्हीरनंतर आता प्लाझ्माचाही काळाबाजार; 24 तासांत 200 पेशंट

नारायणगाव : ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हीर, ऑक्सिजनची टंचाई त्या बरोबर रोज वाढणारी कोरोना बाधित रुग्णांची संख्या या मुळे जुन्नर तालुक्यातील रुग्णांचे नातेवाईक, प्रशासन व उपचार करणाऱ्या डॉक्टरांची चिंता वाढली आहे. यामध्ये साडेपाच हजार रुपये किंमतीचा प्लाझ्मा तेरा हजार रुपयांना विक्री करणाऱ्या दलालांची टोळी सक्रीय झाल्याने सर्व सामान्य जनता हतबल झाली आहे. रुग्णांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या या यंत्रणेवर कारवाई करण्याची गरज आहे.

जुन्नर तालुक्यात मागील चोवीस तासात २०२ कोरोना रुग्ण आढळून आले. रोज कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांसाठी लेण्याद्री व ओझर येथिल शासकीय कोविड उपचार केंद्रात ५३० साधे बेड आहेत.लेण्याद्री व ओझर उपचार केंद्रात आज अखेर ४३६ रूग्ण दाखल असून, ९४ साधे बेड शिल्लक आहेत. नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात अत्यवस्थ रुग्णांसाठी २५ ऑक्सिजन बेड आहेत. मात्र, या ठिकाणी रूग्ण दाखल असल्याने नवीन रुग्णांना जागा नाही.

हेही वाचा: पुण्यात रुग्णालयेही ‘गॅस’वर; प्रशासनापुढे संकट

तालुक्यातील २१ खासगी रुग्णालयात

कोविड उपचार केंद्र सुरू केले आहे. २१ खासगी कोविड उपचार केंद्रात १५५ साधे बेड, २९० ऑक्सिजन बेड,

१० व्हेंटिलेटर बेड व ५६ आयसीयु बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या पैकी २१ खाजगी कोविड उपचार केंद्रात ६१ साधे बेड, ७३ ऑक्सिजन बेड, २ आयसीयु

बेड, २ व्हेंटिलेटर बेड शिल्लक आहेत. तालुक्यात आज अखेर १ हजार ४४३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. या पैकी १०४१ रुग्ण तालुक्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. सुमारे दोनशे अत्यवस्थ रूग्ण मंचर, खेड, चाकण व पुणे पिंपरी चिंचवड भागांतील रुग्णालयात दाखल आहेत. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नसल्याने नातेवाईक आजी, माजी लोकप्रतिनिधीकडे बेड मिळण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. काही खासगी रुग्णालयात रुग्णांची मोठया प्रमाणात लूट होत असल्याची तक्रार आहे. मात्र, रुग्णांचा जीव महत्वाचा असल्याने नातेवाईक डॉक्टरला देव मानून सांगतील ती औषधे व फी देत आहेत. नातेवाईकांची धावपळ कमी करून रेमडेसिव्हीरचा कळाबाजार थांबवण्यासाठी प्रशासनाने कोविड उपचार केंद्राला रेमडेसिव्हीरचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कोविड उपचार केंद्राला मागणी नुसार रेमीडिसिव्हर मिळत नसल्याने रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी रेमीडिसिव्हर मिळवण्यासाठी नातेवाईक धावपळ करत आहेत. अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी प्लाझ्माची गरज असल्याचे डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना सांगतात.

प्लाझ्मा मिळवण्यासाठी नातेवाईक रात्रीचा दिवस करून पुणे, नगर, नाशिक भागांतील रक्तपेढीचा शोध घेत आहेत. काही खाजगी डॉक्टर प्लाझ्मा देणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल नंबर नातेवाईकांना देतात. सदर व्यक्ती ५ हजार ५०० रुपये किंमतीचा प्लाझमाची तेरा हजार रुपयांना विक्री करतो. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर म्हणेल ते करायची नातेवाईकांना तयारी ठेवावी लागते.याचा गैरफायदा काही खासगी डॉक्टर घेत आहेत.

हेही वाचा: बारामतीत रेमडेसिव्हिरच्या बाटलीत पॅरासिटामॉल भरुन विक्री; चौघांना अटक

डॉक्टर, प्लाझ्मा एजट व रक्तपेढी अशी साखळी तयार झाल्याचे चित्र दिसत आहे. सामाजिक कार्यकर्ते शिवम घोलप व त्यांच्या सहकाऱ्यांनी आळेफाटा येथील एका खाजगी कोविड केंद्रात प्लाझमाची तेरा हजार रुपयांना विक्री करणाऱ्या संगमनेर येथील एजटला पकडून चोप दिला. त्या नंतर जास्तीची घेतलेली रक्कम त्या एजटने पुन्हा नातेवाईकांना दिली.

मागील वर्ष भरापासून मी व माझे एक मराठा लाख मराठा ग्रुप मधील तरुण कोरोना रुग्णांना आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरवण्याचे काम मानवतेच्या भावनेतून निःशुल्क करत आहोत. मात्र दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांच्या हतबलतेचा फायदा काही डॉक्टर घेत आहेत. रेमीडिसिव्हर, प्लाझमाचा काळाबाजार सुरू आहे. काल आळेफाटा येथील खाजगी कोविड केंद्रात दोन प्लाझमाची सव्वीस हजार रुपयांना विक्री करणाऱ्या संगमनेर येथील एजटला आम्ही रंगेहाथ पकडले. जास्त घेतलेली १५ हजार रुपयांची रक्कम त्याने पुन्हा नातेवाईकांना दिली.

- शिवम घोलप, सामाजिक कार्यकर्ते

जुन्नर तालुक्याची स्थिती

एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या - ९ हजार ५१३

बरे झालेले रुग्ण - ७ हजार ७८३

मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या - २८७

उपचार सुरू असलेले रुग्ण - १ हजार १४३

Web Title: Junnar Taluka Plasma Black Market After Remdesivir

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Corona PatientPlasma