
शिवजन्मभूमी शिवनेरी आणि अष्टविनायकांपैकी लेण्याद्री, ओझर ही देवस्थाने जुन्नर तालुक्यात आहेत. पण येथील काही समस्या कायम आहेत. याशिवाय पुणे- नाशिक आणि नगर-कल्याण हे दोन महामार्ग याच तालुक्यातून जातात.
विधानसभा 2019
जुन्नर विधानसभा मतदारसंघ
शिवजन्मभूमी शिवनेरी आणि अष्टविनायकांपैकी लेण्याद्री, ओझर ही देवस्थाने जुन्नर तालुक्यात आहेत. पण येथील काही समस्या कायम आहेत. याशिवाय पुणे- नाशिक आणि नगर-कल्याण हे दोन महामार्ग याच तालुक्यातून जातात.
गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील नारायणगाव आणि आळेफाटा येथे वाहतूक कोंडी पाचवीलाच पुजलेली असते. तालुक्यात बिबट्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत आहे. या समस्या सोडविण्यात अद्याप एकाही राजकीय पक्षाला यश आलेले नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेला, पुण्याच्या उत्तरेकडील जुन्नर विधानसभा मतदारसंघ. नाणे, दाऱ्या आणि माळशेज या घाटांच्या निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि तब्बल पाच धरणे असलेला हा तालुका. राज्य सरकारने गतवर्षीच पर्यटन तालुका म्हणून याची निवड केली. याशिवाय शिवजन्मभूमी शिवनेरी आणि अष्टविनायकांपैकी लेण्याद्री, ओझर ही देवस्थाने या तालुक्यात आहेत. याशिवाय पुणे- नाशिक आणि नगर- कल्याण हे दोन महामार्ग याच तालुक्यातून जातात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील नारायणगाव आणि आळेफाटा येथे वाहतूक कोंडी पाचवीलाच पुजलेली आहे. तालुक्यात बिबट्यांची दहशतही कायम आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी येथील नागरिकांची अपेक्षा आहे. ती पूर्ण करण्यात अद्याप एकाही राजकीय पक्षाला किंवा लोकप्रतिनिधीला यश आलेले नाही.
पुणे- नाशिक महामार्गावरील नारायणगाव ही टोमॅटोची मोठी बाजारपेठ आहे. येथे द्राक्षे आणि उसाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. या तीन पिकांच्या माध्यमातून प्रतिवर्षी सुमारे दोन हजार कोटींची उलाढाल या तालुक्यात होते. यापैकी उसाची उलाढाल सुमारे ३०० कोटी, द्राक्षांची ४५० कोटी आणि टोमॅटोची १५० कोटींची आहे.
पूर्व भागात पाण्याचे दुर्भिक्ष
तालुक्याच्या पश्चिम भागात माणिकडोह, येडगाव, वडज, पिंपळगाव जोगे आणि चिल्हेवाडी ही कुकडी प्रकल्पातील पाच धरणे आहेत. तरीही तालुक्याच्या पूर्व भागातील गावांत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. या गावांना टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे. ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ या उक्तीप्रमाणे अवस्था झाली आहे.
रेल्वेचा विषय रेंगाळलेलाच
नगर- कल्याण आणि पुणे- नाशिक हे महामार्ग आळेफाटा येथे एकमेकांना मिळतात. त्यामुळे या फाट्यावर कायमच वाहतूक कोंडी असते. नारायणगाव येथेही वर्षानुवर्षे कोंडीचा प्रश्न भेडसावतो. कोंडीतून सुटका व्हावी, यासाठी नारायणगावजवळ बाह्यवळण रस्ता मंजूर करण्यात आला आहे. परंतु त्याचे काम प्रलंबित आहे.
‘शिवनेरीवर रोप वे करा’
शिवनेरी किल्ला विकास आराखडा मंजूर झालेला आहे. परंतु या आराखड्यातील काही कामे अद्याप प्रलंबित आहेत. यामध्ये लेण्याद्रीपासून शिवनेरीपर्यंत रोप वे करण्याचा प्रस्ताव आहे. तो त्वरित पूर्ण करावा आणि रायगडच्या धर्तीवर शिवनेरीचा विकास करावा, अशी जुन्नर तालुक्यातील नागरिकांची इच्छा आहे.
नागरिकांच्या अन्य प्रमुख मागण्या
शेतीमालाला किफायतशीर भाव द्या
शेती प्रकिया उद्योग अन् औद्योगिक विकास व्हायला हवा
रोजगारनिर्मितीला चालना मिळावी
पर्यटनासाठी दळणवळणाच्या सुविधा निर्माण कराव्यात
धरणांच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन आणि वाटप व्हावे
प्रलंबित येडगाव- ओझर नौकाविहार प्रकल्प पूर्ण करावा
येडगाव धरणात प्रस्तावित असलेले (कै.) यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक पूर्ण करावे