#PuneSafety : थोरात कुटुंबीयांना संपविण्याच्या तयारीतच आला होता कलशेट्टी 

kalshetty
kalshetty

पुणे : विरोधात गुन्हा नोंदविल्याने झालेल्या बदनामीचा बदला घेण्यासाठी कलशेट्टी याने थोरात कुटुंबालाच संपविण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याची बाब समोर आली आहे. त्या दृष्टीने तयारी करून तो पुण्यात आला होता. 

मंगळवारी रात्री सदाशिव पेठेत रोहित विजय थोरात याच्यावर अॅसिड हल्ला करून आत्महत्या केलेल्या सिद्धराम विजय कलशेट्टी (वय 25, रा. अक्कलकोट, जि.सोलापूर) याच्याकडील बॅगेत 2 कोयते आणि 2 चाकूही आढळले आहेत. या प्रकरणी रोहित याच्या मैत्रिणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून दोन गुन्हे दाखल आहेत. दुसरा गुन्हा पोलिसांवर गोळीबार केल्याचा आहे. त्या प्रकरणात पोलिस शिपाई सचिन जगदाळे यांनी फिर्याद दिली आहे. अॅसिड हल्ला केल्यानंतर कलशेट्टी एका इमारतीत लपून बसला होता. त्याचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही कलशेट्टी याने गोळीबार केला. मात्र पोलिस त्यांच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच स्वत:च्या कपाळावर गोळी झाडून इमारतीच्या डक्‍टमध्ये उडी मारली. 

अॅसिड फेकल्यानंतर रोहित घटनास्थळावरून पळत होता. त्याचा पाठलाग करीत असताना कलशेट्टीने त्याच्यावर पहिली गोळी झाडली. ही गोळी रोहितच्या पाठीत घुसली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे रोहितच्या मैत्रिणीने आरडा-ओरडा केला. त्यामुळे आरोपी परिसरातील एका इमारतीत घुसला. नागरिकांची गर्दी आणि पोलिस आल्याने पळून जाणे शक्‍य न झाल्याने इमारतीच्या डक्‍टमध्येच थांबला. पोलिस टेरेसवर पोहचताच त्याने त्यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. पोलिसांनी आडोसा घेत आरोपीला शरण येण्याचे आवाहन केले. यानंतर काही क्षणातच पुन्हा गोळी झाडल्याचा आवाज झाला. थोडा वेळ थांबून पोलिस आरोपीजवळ गेले असता तो मृत अवस्थेत पडलेला दिसला. त्यामुळे त्याला बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांची मदत घेण्यात आली. कलशेट्टी याने एकूण चार गोळ्या झाडल्याचे आत्तापर्यंतच्या तपासातून पुढे आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील कलगुटकर यांनी दिली. 

अटकेमुळे झाली होती बदनामी 
कलशेट्टी हा अक्कलकोट येथील तेलाचा व्यापारी आहे. रोहितची आई ज्योतिषी असून त्यांची फेसबुकवर ओळख झाली होती. दरम्यान त्यांच्यात वाद झाल्याने कलशेट्टीने फेसबुकवर अश्‍लील मेसेज टाकल्यामुळे रोहितच्या आईने त्याच्याविरुद्ध 8 ऑक्‍टोबर 2018 मध्ये विश्रामबाग पोलिस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दिली होती. पोलिसांनी त्याला 12 डिसेंबर 2018 रोजी अटक केली होती. या गुन्ह्यातून तो जामिनावर सुटला होता. तेलाचा व्यापारी तसेच समाजात प्रतिष्ठित व्यक्ती असल्याने अटक झाल्याने त्याची बदनामी झाली होती. यामुळे तो दुकानात न थांबता घरी किंवा मंदिरात बसायचा. अटकेमुळे त्याला मानसिक धक्काही बसला होता. या रागातूनच त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे, असे कलगुटकर यांनी सांगितले. 

रोहित याची प्रकृती गंभीर 
अॅसिड हल्ल्यात रोहित याच्या तोंडाचा काही भाग आणि पोट भाजले आहे. त्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे. तर कलशेट्टी याचा मृतदेह बुधवारी दुपारी त्याच्या मोठ्या भावाच्या ताब्यात देण्यात आला आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com