रस्त्याच्या मालकीवरून पर्यटकांची कोंडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

गावकीचा रस्ता बंद केल्याने भाजगावात घडला प्रकार; पोलिसांनाही धक्काबुक्की 

कामशेत - नाणे मावळातील भाजगाव येथील गावकीचा रहदारीच्या रस्त्यावर एका कुटुंबातील लोकांनी दगडी व सिमेंटचे खांब टाकून रस्ता बंद केल्याने संपूर्ण गावातील ग्रामस्थांचे दळणवळण ठप्प झाले; तसेच १५ पर्यटक वाहनासह अडकून राहावे लागले. रस्ता खुला करून पर्यटकांची सुटका करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याने चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसनाईक व्ही. के. बोऱ्हाडे कामशेत यांनी फिर्याद दिली असून या प्रकरणी मोनिका मारुती बीनगुडे, बारकाबाई दत्तू बीनगुडे व इतर दोन अशा चौघांवर गुन्हा दाखल झाला असून सर्व फरार झाले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरचा रस्ता हा माजी आमदार रूपलेखा ढोरे यांच्या फंडातून गावातील लोकांसाठी त्या वेळी तयार केला होता. परंतु, गेल्या वर्षापासून दत्तू बीनगुडे यांच्या कुटुंबातील लोकांनी जागेवर हक्क सांगत अडवणूक करण्यास सुरवात केली. या प्रकरणी त्यांच्यावर पूर्वीही तीन गुन्हे दाखल आहेत. चार दिवसांपूर्वी रस्त्यावर पुन्हा दगड टाकून तो बंद केला. त्यामुळे फिरण्यासाठी भाजगावला आलेल्या १५ पर्यटक चार दिवस वाहनासह तिथेच राहावे लागले. एका कुटुंबात दोन महिन्यांची लहान मुलगी होती, तर एक पर्यटक पडल्याने त्याचा पायाचे हाड मोडले. मात्र, रस्ता बंद असल्याने त्याला रुग्णालयात जाता आले नाही, ही माहिती ग्रामस्थांनी पोलिसांनी दिली. रविवारी पोलिस गेले असताना त्यांनाही धक्काबुक्की केली.

चार दिवसांनी पर्यटकांची सुटका
सोमवारी सकाळी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. महसूल खात्यातील मंडल अधिकारी, तलाठी यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांनी दगडी व सिमेंटचे खांब बाजूला घेऊन रस्ता खुला केला. चार दिवस गावांत अडकलेल्या पर्यटकांची पोलिसांनी सुटका करून त्यांची वाहने बाहेर काढून दिली. या वेळी एक कुटुंब सोडून संपूर्ण गावाची बैठक पोलिस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी मंदिरात घेतली. या वेळी ग्रामस्थांनी होत असलेल्या अन्यायाबाबत न्याय मिळावा अशी मागणी केली. गावातील सर्व ग्रामस्थांनी सोमवारी तहसीलदारांची भेट घेतली.

Web Title: kamshet pune news road owner issue