Sunday Motivation : इलेक्‍ट्रिक मोटारसायकल करणाऱ्या कपिलला टाटांची साथ 

Electric motercycle of kapil shelke.jpg
Electric motercycle of kapil shelke.jpg

पिंपरी : मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना प्रोजेक्‍टचा भाग म्हणून त्याने पहिल्यांदा इलेक्‍ट्रिक मोटारसायकल तयार केली. युरोपमध्ये झालेल्या Isle of Man या मोटार रेसिंग स्पर्धेत सहभाग घेऊन तिसरा क्रमांक मिळवला तेव्हापासून त्याला संपूर्ण भारतीय बनावटीची इलेक्‍ट्रिक मोटारसायकल तयार करायच्या ध्येयाने झपाटले होते. त्याच्या प्रयत्नांना यश मिळत गेले आणि आता त्याने सुरू केलेल्या कंपनीमध्ये प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी वैयक्‍तिक गुंतवणूक करून त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिक बळ दिले आहे. चिंचवडमधील कपिल शेळके या तरुण उद्योजकाने ही किमया साधली.

तीन आठवड्यांपूर्वी रतन टाटा यांचे प्रतिनिधी शंतनू नायडू यांनी कपिल यांच्या टॉर्क कंपनीला भेट दिली. नव्याने तयार केलेली इलेक्‍ट्रिक मोटारसायकल त्यांनी चालवून बघितली आणि तिला उत्तम असल्याचे सर्टिफिकेट दिले. यानंतर कपिल रतन टाटा यांची भेट घेण्यासाठी गेला. या प्रयत्नाचे त्यांनी तोंडभरून कौतुक करतानाच मी तुमच्या बरोबर राहणार असल्याचे आश्‍वासन दिले. त्याची ही रंजक कहाणी शेळके सांगत होते.

"रतन टाटा यांनी या प्रकल्पामध्ये गुंतवणूक केल्यामुळे आमच्यामधील कामाची ऊर्जा वाढली. पुढील दोन महिन्यांत किंवा नवीन वर्षात स्वदेशी बनावटीची पहिली इलेक्‍ट्रिक मोटारसायकल बाजारपेठेत दाखल होणार आहे. यासाठी चाकणमध्ये दीड एकर जागेत कंपनी उभी राहत आहे. त्याठिकाणी 150 मेकॅनिकल इंजिनिअरची फौज असेल. दहा ते पंधरा ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभी करण्यात येणार आहेत. त्यापैकी एक स्टेशन कोरेगाव पार्क परिसरात सुरू झाले आहे,'' असे कपिल यांनी सांगितले. 

असा सुरू झाला प्रवास 

आकुर्डीच्या डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना 2009 मध्ये कपिल यांना इलेक्‍ट्रिक मोटारसायकलचा प्रोजेक्‍ट देण्यात आला होता. त्या वेळी तयार केलेली T1X ही मोटारसायकल युरोपमधील स्पर्धेत उतरली होती. त्या स्पर्धेमध्ये 16 टीम सहभागी झाल्या होत्या. कपिल यांच्या टीमने तयार केलेल्या मोटारसायकलचा वेग ताशी 156 किलोमीटर इतका होता. या स्पर्धेत त्यांना तिसरे स्थान मिळाले. त्यामुळे उत्साह वाढला. 2010 मध्ये पुन्हा त्याच स्पर्धेत सहभागी झाले. त्या वेळी T2X ही ताशी 210 किलोमीटर वेगाने धावणारी मोटारसायकल तयार केली. या वेळी त्यांना पहिला क्रमांक मिळाला. त्यानंतर चीनमधील कंपनीमध्ये चीफ टेक्‍नॉलॉजी ऑफिसर म्हणून काम करताना ताशी 300 किलोमीटर वेगाने धावणारी मोटारसायकल तयार केली. तेव्हापासून इलेक्‍ट्रिक मोटारसायकलचा सुरू झालेला प्रवास अव्याहतपणे सुरू आहे. कपिल यांचे शालेय शिक्षण सेंट ऍण्ड्रयूज शाळेतून पूर्ण केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com