#VijayDiwas वय 83; पाहा निवृत्त जवान काय करू शकतो!

समाधान काटे 
सोमवार, 16 डिसेंबर 2019

विजय दिनाच्या निमित्ताने साळुंके यांनी देशसेवेसाठी केलेल्या कार्याची आणि त्यांच्या शौर्याची यशोगाथा सांगितली.

पुणे : लष्करातील शिस्त आणि वक्तशीरपणा निवृत्त कर्नल सदानंद साळुंके यांनी वयाच्या ८३व्या वर्षी सामाजिक कार्यातून जपली आहे. नेहमी हसतमुख राहणारे साळुंके हे तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने कार्यरत आहेत. विजयदिनाच्या निमित्ताने साळुंके यांनी देशसेवेसाठी केलेल्या कार्याची आणि त्यांच्या शौर्याची यशोगाथा सांगितली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सप्टेंबर १९६५ मध्ये पाक सरहद्दीवर व डिसेंबर १९७१ भारत -पाकिस्तान युद्धात ऑपरेशन कॅक्‍टस लिली, नैना कोट शहर कबीज करणे, लाहोरजवळील स्टेशन नूरकोट-सियाकोट येथे मालगाडी उडवून मोठा शास्त्रसाठा जप्त केला. साहस, शौर्य व अद्वितीय नेतृत्व, याबद्दल राष्ट्रपतीच्या हस्ते १९७२ मध्ये ‘वीरचक्र’ हे पदक बहाल करण्यात आले. निवृत्तीनंतर हेडक्वार्टर पुणे येथे सब-एरियामध्ये सेवानिवृत्तीनंतरचे अधिकारी म्हणून खास नेमणूक करण्यात आली. सध्या ते सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना मोफत मार्गदर्शन, चैतन्य हास्य मंडळाच्या माध्यमातून हास्य योग शिकवणे, यांसह विविध समाजोपयोगी कार्य करीत आहेत.

'या' पोस्टकार्डची सोशल मिडीयात जोरदार चर्चा

साळुंके यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील. मात्र, शिक्षण पुण्यातील मॉडर्न हायस्कूलमध्ये घेतले. १९६२ मध्ये साळुंके यांनी सैन्यात मराठा रेजिमेंटमध्ये प्रवेश केला. त्यांनी एव्हरेस्टविजेत्या तेनसिंग यांच्याकडून गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांचा मुलगा समीर सैन्यात आहे.

तरुण पिढीने स्वत:पेक्षा समाजाकडे जास्त लक्ष द्यावे. ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आपण समाजात आदर्श निर्माण केला पाहिजे. आई-वडिलांचे नाव कमवावे, अशी कामगिरी तरुणांनी करावी.
- सदानंद साळुंके, माजी सैनिक

माझे पती कर्नल सदानंद व मुलगा ब्रिगेडिअर समीर यांनी देशासाठी केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो. यांच्यामुळे आम्हाला समाजात आदर मिळतो.
- सरिता सदानंद साळुंके, पत्नी

मिळालेले सन्मान
राष्ट्रपतींच्या हस्ते  ‘वीरचक्र’- १९७२
राज्यपालांच्या हस्ते ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ - १९९०
कै. ग. दि. माडगूळकर, ‘सकाळ’चे तत्कालीन संपादक
डॉ. ना. भि. परुळेकर यांच्या हस्ते सत्कार - १९७२

सैन्यात असताना भूषविलेली पदे
ऑफिसर कमांडिंग मध्य प्रदेश बटालियन
डेप्युटी डायरेक्‍टर राष्ट्रीय छात्र सेना दल
डेप्युटी ब्रिगेड कमांडर (अमृतसर-फिरोजपूर)
ग्रुप कमांडर एनसीसी, बेळगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kargil Vijay Diwas Special story