कार्तिकी वारीचा मार्ग सुकर

पीतांबर लोहार
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

पिंपरी - आळंदी बाह्यवळण चऱ्होली बुद्रुक-दाभाडे वस्तीतील ४५ मीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी वारीत वाहनचालकांना पर्यायी रस्ता उपलब्ध होणार असल्याने वारकरी व भाविकांचीही सोय होणार आहे. 

पिंपरी - आळंदी बाह्यवळण चऱ्होली बुद्रुक-दाभाडे वस्तीतील ४५ मीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी वारीत वाहनचालकांना पर्यायी रस्ता उपलब्ध होणार असल्याने वारकरी व भाविकांचीही सोय होणार आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे चऱ्होलीतील दाभाडे वस्ती येथे सुमारे ६५० मीटर लांबीचा आणि ४५ मीटर रुंदीचा रस्ता विकसित केला जात आहे. त्यामुळे इंद्रायणीनदीवरील सरकार दाभाडे पूल व चऱ्होली फाटा ते चऱ्होलीगाव रस्ता म्हसोबा मंदिराजवळ जोडला जाणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधून धानोरे, मरकळ एमआयडीसी व नगर रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांची सोय होणार आहे. सध्या आळंदीत प्रदक्षिणा मार्गाचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण सुरू आहे. शिवाय संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधी सोहळा, अर्थात कार्तिकी वारीनिमित्त आळंदीत वाहनांना प्रवेश बंद केला जातो. पुणे रस्त्यावरील चऱ्होली फाटा व मोशी-देहू रस्त्यावरील डुडुळगाव येथे बॅरिकेड्‌स लावून आळंदीकडे येणारी वाहने थांबविली जातात. त्यामुळे वारीच्या कालावधीत वाहनचालकांना विश्रांतवाडी, येरवडा मार्गे किंवा चाकण शिक्रापूरमार्गे नगर रस्त्याला किंवा धानोरे-मरकळ एमआयडीसीत जावे लागते. या पाच-सहा किलोमीटरसाठी ३०-४० किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. यातून दाभाडे वस्तीतील रस्त्यामुळे सुटका होणार आहे. 

आळंदी मरकळ रस्त्यावरील चऱ्होली खुर्द फाटा येथून इंद्रायणी नदीवरील दाभाडे सरकार पुलापर्यंत दोन वर्षांपूर्वीच चार पदरी डांबरी रस्ता तयार होतो. केवळ पुलापासून ते चऱ्होली बुद्रुक येथील म्हसोबा मंदिर या सुमारे ६५० मीटरचा मंजूर रस्ता विकसित केलेला नव्हता. या ठिकाणी बागायती शेती असल्याने व योग्य मोबदला न मिळाल्याने स्थानिक शेतकऱ्यांचा रस्त्याला विरोध होता. मात्र गेल्या वर्षी मोबदला मिळाल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. ते आता पूर्णत्वाकडे आहे. या रस्त्यामुळे म्हसोबा मंदिरापासून चऱ्होलीगाव मार्गे लोहगाव व चऱ्होली फाटा मार्गे विश्रांतवाडी, पुणे, पिंपरी, चिंचवड, भोसरी, मोशी, चाकणकडे जाता येणार आहे.

लांबी - ६५० मीटर
रुंदी - ४५ मीटर
लेन - ६

सद्य:स्थिती
म्हसोबा मंदिराजवळील नाल्यावर पूल बांधण्यात येणार आहे. त्याच्या भिंती तयार असून, केवळ स्लॅब टाकणे शिल्लक आहे. एका शेतकऱ्याच्या जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्‍न लवकरच सुटण्याची शक्‍यता असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. हे क्षेत्र केवळ २० ते ३० फूट लांबीचे आहे. या ठिकाणासह नाल्यावरील पुलाच्या ठिकाणी वळण रस्ता तयार केलेला आहे. तेथून सध्या रहदारी सुरू आहे. आळंदीतील प्रदक्षिणा मार्गाचे सध्या काम सुरू असल्याने बहुतांश वाहने दाभाडे वस्तीतील रस्त्याचाच वापर करीत आहेत. या रस्त्याचे खडीकरण पूर्ण झाले असून, केवळ डांबरीकरण होणे आहे.

नवीन रस्त्यामुळे आमच्या भागाचा विकास होणार आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाला विरोध केलेला नाही. पण जमिनीचा मोबदला वेळेत मिळायला हवा.
- बाजीराव दाभाडे, शेतकरी, चऱ्होली बुद्रुक

Web Title: Kartik Wari Road Work