माउलींचा संजीवन समाधीदिन सोहळा 25 रोजी

mauli1.jpg
mauli1.jpg

आळंदीत कार्तिकी वारीस 20 पासून सुरवात; तिथीचा क्षय झाल्याने मुख्य कार्यक्रम एक दिवस पुढे

आळंदी (जि. पुणे) ः संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 724 व्या संजीवन समाधीदिन सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या कार्तिकी वारीची सुरवात देऊळवाड्याच्या महाद्वारातील गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने 20 नोव्हेंबरला होणार आहे. कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबरला आहे. एकादशीनंतर येणाऱ्या द्वादशी या तिथीचा क्षय झाल्याने समाधीदिन सोहळा 24 ऐवजी कार्तिक वद्य त्रयोदशी म्हणजे 25 नोव्हेंबरला होणार आहे, अशी माहिती आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड विकास ढगे यांनी दिली.

ऍड ढगे यांनी सांगितले की, कार्तिकी वारीची सुरवात यंदा कार्तिक वद्य अष्टमीला म्हणजे बुधवारी (ता.20) गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने सकाळी सात ते नऊ या वेळेत होईल. दरम्यान, राज्यातील सर्वच दिनदर्शिकांमध्ये लागोपाठ दोन एकादशी दाखविल्या आहेत. संप्रदाय भागवत एकादशी साजरी करत असल्याने शनिवारी (ता.23) एकादशीनिमित्त मध्यरात्री बारा ते पहाटे दोनच्या दरम्यान माउलींच्या समाधीस 11 ब्रम्हवृंदांच्या वेदघोषात पवमान अभिषेक आणि दुधारती होईल. या कालावधीत भाविकांना समाधीदर्शन बंद असेल. पवमान अभिषेकानंतर समाधीदर्शन पुन्हा सुरू केले जाईल. या दिवशी भाविकांच्या महापूजा बंद असतील. दुपारी एक वाजता माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी देऊळवाड्यातून बाहेर पडेल. नगरप्रदक्षिणेनंतर पालखी रात्री साडेआठला देऊळवाड्यात परतणार असून रात्री बारा ते दोन जागर होईल.

एकादशीच्या पहाटपूजेनंतर रविवारी (ता. 24) द्वादशी साजरी केली जाणार असून मध्यरात्री दोनला माउलींच्या समाधीवर पवमान अभिषेक होईल. त्यानंतर पहाटे साडेतीन ते चार या वेळेत प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय पूजा होईल. त्यानंतर भाविकांच्या महापूजा होतील. दरम्यान, दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत माउलींचा रथ नगरप्रदक्षिणेसाठी देऊळवाड्यातून बाहेर पडेल. गोपाळपुरातून या रथोत्सवास सुरवात होणार असून सायंकाळी सातच्या दरम्यान माउलींची पालखी मंदिरात पोचल्यावर रथोत्सवाची सांगता होईल. रात्री अकरा ते बारा या वेळेत मानकरी, फडकरी, दिंडीप्रमुख, सेवेकरी यांना नारळप्रसाद वाटप केले जाणार आहे.

मुख्य संजीवन समाधीदिन सोहळा सोमवारी (ता. 25) साजरा केला जाणार आहे. पहाटे पवमान अभिषेकानंतर भाविकांच्या महापूजा आणि नामदेवराय यांच्या वंशजांच्या वतीने महापूजा होईल. सकाळी सात ते नऊ या वेळेत महाद्वारातील हैबतबाबांच्या पायरीपुढे आणि साडेसात ते साडेनऊ या वेळेत वीणा मंडपात मानाचे कीर्तन होईल. त्यानंतर सकाळी दहा ते बारा वेळेत वीणा मंडपात मुख्य समाधी सोहळ्याचे कीर्तन संत नामदेव महाराज यांचे वंशज नामदास महाराज यांच्यावतीने होईल. दुपारी बारा वाजता घंटानाद झाल्यानंतर पुष्पवृष्टी व आरतीनंतर मानकऱ्यांना नारळप्रसाद दिला जाईल. मंगळवारी (ता. 26) रात्री साडेनऊला माउलींच्या पालखीच्या नगरप्रदक्षिणेनंतर संजीवन समाधीदिन सोहळ्याची सांगता होणार आहे.

 
...म्हणून सोहळा रविवारऐवजी सोमवारी
यंदाच्या वर्षी द्वादशीचा क्षय झाला आहे. त्यामुळे शनिवारी एकादशी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी (रविवारी) दिनदर्शिका आणि पंचांगामध्ये द्वादशीऐवजी त्रयोदशी दाखविली आहे. द्वादशीचा क्षय दाखविण्यात आला आहे. मात्र, वारकरी परंपरेप्रमाणे आधी द्वादशी आणि मग त्रयोदशी साजरी केली जाणार असल्याने समाधीदिन सोहळा रविवारऐवजी (ता. 24) सोमवारी (ता.25) होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com