कर्वेनगर पूल दोन महिन्यांत खुला 

ज्ञानेश्‍वर बिजले 
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

पुणे - कर्वेनगर येथे बांधण्यात येत असलेल्या पुलाचे बराच काळ रखडलेले काम आता मार्गी लागत असून, या पुलाच्या वारजेकडून कर्वे रस्त्याकडे येणारा भाग येत्या दोन महिन्यांत खुला करण्यात येईल. मात्र, कर्वेनगरकडून वारजेकडे जाणारा दुसरा भाग पूर्ण होण्यास मेअखेरपर्यंत वाट पाहावी लागेल.

एनडीए, उत्तमनगर, वारजेपासून पुण्यात येणाऱ्या नागरिकांना सहन करावी लागणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या पुलाचे काम हाती घेण्यात आले. हा एक्‍स आकाराचा पूल असून रॅम्प चढून गेल्यानंतर येणारा मधला भाग सामायिक राहणार आहे. 

कर्वेनगरच्या या पुलाचे काम सुरू होण्यापासूनच त्याचे वेळापत्रक बिघडण्यास सुरवात झाली. महापालिकेच्या तांत्रिक छाननी समितीने ऑक्‍टोबर २०११ मध्ये येथे ४४.९१ कोटी रुपये खर्च करून दोन पूल उभारण्यास मान्यता दिली. मुंबईतील सिम्प्लेक्‍स इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेड या कंपनीची ४१.३७ कोटी रुपयांची निविदा स्थायी समितीने फेब्रुवारी २०१२ मध्ये मंजूर केली. त्यानंतर ठेकेदारास काम सुरू करण्याचा आदेश देण्यास ऑक्‍टोबर उजाडला. पूल बांधण्यासाठी तीस महिन्यांची मुदत देण्यात आली. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन १० फेब्रुवारी २०१३ रोजी झाले; मात्र वाहतूक पोलिसांची परवानगी ऑगस्ट २०१३ मध्ये मिळाल्यावर या कामाला प्रारंभ झाला.

पुलाचे काम सुरू झाले खरे; पण कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडल्याने ते रेंगाळले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला दंड केला. 

महापालिकेचे अधीक्षक अभियंता विजय शिंदे म्हणाले, ‘‘कमिन्स महाविद्यालयाजवळील चौकात पाच स्लॅब रस्त्याच्या मध्यभागी आहेत. त्यानंतर दोन्ही बाजूला जाण्यासाठी पुलावरून स्वतंत्र मार्ग करण्यात येत आहेत. वारजेकडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या पुलाचे चार स्लॅब करण्याचे काम बाकी आहे, ते काम फेब्रुवारीत पूर्ण करण्यास कंत्राटदाराला सांगितले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूचे रॅम्पचे काम सुरू केले आहे. पहिल्यांदा पुलाचा हा भाग वाहतुकीसाठी खुला केला जाईल. पुलाची दुसरी बाजू एप्रिलअखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी आम्ही कंत्राटदाराकडे पाठपुरावा करीत आहोत. या भागाच्या १३ स्लॅबपैकी ७ स्लॅबचे काम झाले असून, सहा स्लॅब बाकी आहेत, तसेच रॅम्पचे कामही राहिलेले आहे. २२ कोटी रुपयांच्या कामापैकी १५ कोटी रुपयांचे काम म्हणजे ६५ टक्के काम आत्तापर्यंत झाले आहे.’’

कंत्राटदाराकडून  ३४ लाख वसूल 
कंत्राटदाराच्या कामाचा वेग कमी असल्याने १५ जून २०१५ पासून प्रतिदिन सहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आणि त्यापोटी ३१ डिसेंबरला त्याच्याकडून ३४ लाख रुपये वसूल केले, अशी माहिती अधीक्षक अभियंता विजय शिंदे यांनी दिली. 

पुलाची माहिती 
४१.३७ कोटी रुपये खर्च 
५५० मीटर लांबी 
१५ मीटर रुंदी 
२२ एकूण स्लॅब
१२ पूर्ण झालेले स्लॅब

Web Title: Karvenagar bridge open in two months