आठवणींच्या शिदोरीने रसिक ‘पुलकित’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

पुणे - मित्र म्हणून लाभलेले... गप्पांमध्ये रमणारे... समाजमन ओळखणारे अन्‌ खळखळून हसविणारे पुलं... आठवणींच्या शिदोरीतून रसिकांसमोर उलगडत गेले अन्‌ अख्खे बालगंधर्व रंगमंदिर ‘पुलकित’ झाले. हसविणारे, रडविणारे आणि अंतर्मुख करायला लावणाऱ्या पुलंचं रसिकांवर असलेलं गारुड अजूनही कमी झाले नसल्याची प्रचिती रसिकांच्या ‘हसऱ्या’ चेहऱ्यांनी मंगळवारी दिली. 

पुणे - मित्र म्हणून लाभलेले... गप्पांमध्ये रमणारे... समाजमन ओळखणारे अन्‌ खळखळून हसविणारे पुलं... आठवणींच्या शिदोरीतून रसिकांसमोर उलगडत गेले अन्‌ अख्खे बालगंधर्व रंगमंदिर ‘पुलकित’ झाले. हसविणारे, रडविणारे आणि अंतर्मुख करायला लावणाऱ्या पुलंचं रसिकांवर असलेलं गारुड अजूनही कमी झाले नसल्याची प्रचिती रसिकांच्या ‘हसऱ्या’ चेहऱ्यांनी मंगळवारी दिली. 

आठवणीतले... मनात वसलेले अन्‌ हवेहवेसे वाटणारे पुलं पुन्हा एकदा रसिकांना अनुभवता आले. निमित्त होते ‘पु. ल. परिवार’, ‘आशय सांस्कृतिक संस्था’ आणि ‘स्क्वेअर वन इव्हेंट्‌स अँड मीडिया’ तर्फे पु.ल. देशपांडे यांच्या स्मृतिदिनी आयोजिलेल्या ‘या सम हा’ या विशेष कार्यक्रमाचे. यानिमित्ताने पुलंचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उलगडणारा परिसंवाद आयोजित करण्यात आला. त्यात साहित्यिक द. मा. मिरासदार, लेखक डॉ. अनिल अवचट, अभिनेते माधव वझे, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सहभाग घेतला. 

मिरासदार यांनी पुलंमधील विनोदी व्यक्‍तिमत्त्व उलगडत रसिकांना खदखदून हसविले, तर डॉ. अवचट यांनी समाजभान जपणाऱ्या पुलंच्या आठवणींना उजाळा दिला. कृष्णकुमार गोयल, वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार उपस्थित होते. कार्यक्रमात सुधीर मोघे आणि मुक्ता राजाध्यक्ष यांनी दिग्दर्शित केलेला ‘या सम हा...’ या लघुपटाचे सादरीकरण करण्यात आले. परचुरे प्रकाशनातर्फे पुलंच्या साहित्यावर आधारित ‘कसा मी, असा मी’ या पुस्तकाचे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

पुलंचा मोकळेपणा मला आवडायचा. मी त्यांना नेहमी भेटायचो. अगदी वीजबिल भरण्यापर्यंतची मी त्यांची कामे केली आहेत. मुक्तांगण केंद्राच्या उभारणीतही त्यांनी हातभार लावला. पुलं सर्वांच्या मनात ठासून भरले आहेत ते त्यांच्या साधेपणामुळे.
- डॉ. अनिल अवचट, लेखक

पुलं हे माझ्यापेक्षा वयाने मोठे होते. पण त्यांच्याशी जुळलेला मैत्रीचा बंध माझ्यासाठी खास होता. पुण्यात ऑल इंडिया रेडिओचे स्टेशन झाल्यानंतर स्टुडिओमध्ये पुलंना अनेकजण भेटायला यायचे. त्यांच्यात नेहमी गप्पा रंगायच्या. ते सर्वांना खळखळून हसवायचे. 
- द. मा. मिरासदार, साहित्यिक

Web Title: kasa mi asa mi book publish