
Kasaba ByPoll : "मला ४० वर्षे काहीच दिलं नाही"; बाळासाहेबांनी सांगितलं काँग्रेसमधल्या बंडखोरीचं कारण
कसबा मतदारसंघात आता काँग्रेसविरोधातला असंतोष उफाळून येताना दिसत आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब दाभेकर यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेस पक्षावर काही गंभीर आरोप केले आहेत.
बाळासाहेब दाभेकर यांनी अर्ज दाखल करायला जात असताना 'सकाळ'च्या प्रतिनिधीशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना काँग्रेसकडून आपल्यावर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली. दाभेकर म्हणाले, "मी काँग्रेसचा जुना कार्यकर्ता आहे. मला काँग्रेसने डावललं, म्हणून मला अपक्ष अर्ज भरण्याची वेळ आली. "
पक्षावर आरोप करताना दाभेकर म्हणाले, "माझ्यावर पक्षाने अन्याय केला म्हणून ही वेळ आली आहे. पक्षाने ४० वर्षे मला काहीच दिलं नाही. पक्षामध्ये गटबाजी सुरू आहे. फक्त नाना पटोलेच नव्हे तर त्यांच्या आजूबाजूचे लोकही आहेत, इतर लोकही आहेत, त्यांच्यामुळे ही वेळ आली आहे."
दरम्यान, सत्यजित तांबे प्रकरणामुळे आज ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना लिहिलेल्या पत्रामध्ये थोरात यांनी नाना पटोले, तसंच काँग्रेस पक्षाबद्दल अनेक तक्रारी केल्या आहेत.