कसबा पेठेतील रहिवाशांचा मेट्रोच्या स्थानकाला विरोध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

पुनर्वसनासाठी ठोस पर्याय
रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी ठोस पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यांचे कसबा पेठेतच पुनर्वसन होणार आहे. त्यांना कोठेही लांबवर जावे लागणार नाही. तसेच त्यासाठीचा खर्च महामेट्रो आणि महापालिका करणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले.

पुणे - कसबा पेठेत मेट्रो स्थानकासाठी जागा उपलब्ध करून देणार नाही, असे निवेदन कसबा पेठ रहिवासी नियोजित मेट्रो स्टेशन विरोधी मंचने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच दिले. 

कसबा पेठेत मेट्रोचे स्थानक होणार आहे. त्यामुळे २४८ घरे, ५ मंदिरे व एक मशिद बाधित होणार आहे. त्यामुळे नियोजित मेट्रोच्या स्थानकाबद्दल मंचने ३ आंदोलने केली आहेत. त्याची दखल पालकमंत्री गिरीश बापट घेत नाहीत, असा रहिवाशांचा आरोप आहे. 

विठ्ठल मंदिर बाधित होत असल्यामुळे विश्‍व वारकरी संघानेही आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पुढील काळात मेट्रो कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. 

कसबा पेठेतील नियोजित मेट्रो स्थानकाच्या निषेधार्थ लोकसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मंचने म्हटले आहे.

Web Title: Kasaba Peth People Metro Station Oppose