Kasba Bypoll Election: ...म्हणून टिळक कुटुंबीयांना उमेदवारी दिली नाही; चंद्रकांत पाटलांचा खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mukta tilak, chandrakant patil and devendra fadnavis

Kasba Bypoll Election: ...म्हणून टिळक कुटुंबीयांना उमेदवारी दिली नाही; चंद्रकांत पाटलांचा खुलासा

काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आणि चर्चेचा विषय ठरलेल्या पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भाजपला पराभवाचा मोठा धक्का बसला. या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली. कसब्याची पोटनिवडणूक ही उमेदवारांच्या निवडीपासून ते निकालापर्यंत राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली होती.

कसबा पोटनिवडणुकीत भाजपकडून मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातीलच एखाद्या व्यक्तीला उमेदवारी मिळेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात होता. मात्र, भाजप नेतृत्त्वाने टिळक कुटुंबीयांना डावलून हेमंत रासने या ब्राह्मणेतर उमेदवाराला संधी दिली होती. त्यामुळे पुण्यातील ब्राह्मण समाज नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली होती. याची प्रचिती पेठांमधील मतदानाच्या टक्केवारीत उमटल्याचे दिसून आले होते.

भाजपचा कायमचा असलेल्या पेठांमधील मतदारांनी भाजपकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. अपेक्षित साथ न दिल्याचा फटका हेमंत रासने यांना कसबा पोटनिवडणुकीत बसला होता. या पराभवानंतर भाजपमध्ये आत्मचिंतन सुरु झाले. कसब्यामध्ये टिळक कुटुंबीयांऐवजी हेमंत रासने यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी आपले राजकीय वजन खर्ची घातले होते. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीतील पराभवाचे खापर चंद्रकांत पाटील यांच्यावरही फोडण्यात आलं. भाजपची उमेदवाराची निवड चुकल्यामुळेच कसब्यात पराभव झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

या सर्व चर्चेवर चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना कसब्यात टिळक कुटुंबीयांऐवजी हेमंत रासने यांना का उमेदवारी दिली, याचं कारण स्पष्ट केलं आहे.

चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले की, मुक्ता टिळक यांच्या आजारपणामुळे टिळक कुटुंबाचा मतदारांशी राजकीय संपर्क तुटला होता. आजारपणामुळे मुक्ताताईंचं दिसणं, असणं, अस्तित्व हे संपलं होतं. त्यांचे पती आणि त्यांचा मुलगा यांना मुक्ताताईंच्या सेवेत इतका वेळ द्यावा लागला, त्यामुळे त्यांचा राजकीय आणि सामाजिक एक्जिस्टन्सही कमी झाला होता.

पुढे ते म्हणाले की, मुक्ताताई चांगल्या कार्यकर्त्या होत्या, म्हणून त्या महापौर झाल्या, आमदारही झाल्या. त्यांचे पती सक्रीय आणि त्यांचा मुलगा आमचा पदाधिकारी, पण घरातल्या परिस्थितीमुळे त्यांचा प्रभाव कमी झाला होता. त्यामुळेच कसबा पोटनिवडणुकीत भाजपने टिळक कुटुंबाबाहेर उमेदवारी दिली, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात आता काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.