कात्रज - शेजारी देशांनी कितीही प्रयत्न केले तरी काश्मिरी जनता कधीही त्यांना साथ देणार नाही. देशसेवेत त्यांचे योगदान मोठे आहे. हिंसाचार व अराजकतेच्या वातावरणातही त्यांनी आपण भारताचा अविभाज्य भाग असल्याचे सिद्ध केले आहे..या प्रयत्नांना सरहदसारख्या संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. काश्मीरसोबत सारा देश उभा आहे, हे सरहदने दाखवून दिले आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काढले.सरहद संस्थेच्या गुजरवाडी शैक्षणिक संकुलात उभारण्यात आलेल्या विजय धर ॲम्फी थिएटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ काश्मिरी विचारवंत विजय धर, त्यांची पत्नी कविता धर, कन्या कनिका धर, सरहदचे संस्थापक संजय नहार, प्राचार्य सुषमा नहार, संतसिंग मोखा, डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर, आर्किटेक्ट इम्रान शेख, वसंत मोरे आदी उपस्थित होते..पवार म्हणाले, पुण्याने शिक्षण, उद्योग, संस्कृती, आयटी या सर्वच क्षेत्रांत देशाला मार्गदर्शन केले आहे. लोकमान्य टिळकांनी याच पुण्यातून लोकांना एकत्र आणले. पंजाबने धान्यकोठार म्हणून योगदान दिले तसेच काश्मीर हा भारताचा ‘हीरा’ आहे. परिस्थिती अस्थिर असूनही विजय धर व सरहद संस्थेने शिक्षणक्षेत्रात केलेले काम महत्त्वपूर्ण आहे..शिंदे म्हणाले, १९७४ मध्ये पवार साहेबांनी माझी ओळख विजय धर यांच्याशी करून दिली. त्यानंतरपासून त्यांच्या कार्याशी मी परिचित आहे. काश्मीरमध्ये शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सरहदने ॲम्फी थिएटर उभारले, ही प्रशंसनीय बाब आहे..मी गृहमंत्री असताना परिस्थिती आटोक्यात होती, मात्र आता ती बिघडलेली दिसते. विजय धर म्हणाले, शरद पवार यांनी सुरुवातीला मला बारामतीला बोलावून तेथील कार्य दाखवले. काश्मीरमध्ये शिक्षणक्षेत्रात सकारात्मक काम करण्याचा प्रयत्न केला, त्याला सरहदने मोठी साथ दिली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना संजय नहार यांनी विजय धर यांनी शिक्षण, संस्कृती व समाजकारणाच्या क्षेत्रात आदर्श कार्य केले आहे. त्यांच्या कार्याला आदरांजली म्हणूनच ॲम्फी थिएटर उभारल्याची माहिती दिली. नवकार मंत्र व राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. लेशपाल जवळगे यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन नीरजा आपटे यांनी केले..आमची घरे वाचवा; म्हणत नागरिकांचे पवारांना साकडेपवार कार्यक्रमासाठी निघाले असता रिंगरोडच्या प्रस्तावित मार्गामुळे मांगडेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी व भिलारेवाडी परिसरातील घरे वाचवावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली. नागरिकांनी गाडी थांबवून त्यांना निवेदन दिले. रिंगरोड घरांवरून नेण्याऐवजी पर्यायी मार्गांचा विचार करावा, अन्यथा अनेकांना कर्ज काढून बांधलेली घरे गमवावी लागतील..तसेच, सातबारा व खरेदीखते नियमित होत असताना रिंगरोडचे सर्व्हे नंबर ब्लॉक का करण्यात आले नाहीत, असा सवाल नागरिकांनी केला. पुणे महापालिकेच्या कर आकारणीच्या पावत्या असतानाही आता घरांवर गदा येत असल्याचे यावेळी नागरिकांकडून सांगण्यात आले. यावेळी पवारांना निवेदन स्विकारले मात्र, कोणतेही उत्तर देणे टाळले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.