कातकरी कुटुंबे घरकुलांपासून वंचित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

भोरगिरी - भोमाळे (ता. खेड) येथे घरकुलांची कामे रखडल्याने पाच कातकरी कुटुंबे घरकुलांसाठी तीन वर्षांपासून वंचित आहेत.

भोरगिरी - भोमाळे (ता. खेड) येथे घरकुलांची कामे रखडल्याने पाच कातकरी कुटुंबे घरकुलांसाठी तीन वर्षांपासून वंचित आहेत.

भोमाळे येथे कातकऱ्यांसाठी घरकुले मंजूर झाली होती. त्यासाठी ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठविल्यानंतर त्याला जिल्हा परिषदेने मंजुरी देऊन घरांची कामेही सुरू झाली. ऐंशी टक्के काम पूर्णदेखील झाले. फक्त दरवाजे आणि फरशी बसविण्याचे काम बाकी आहे. या कामासाठी पैशाच्या पुढच्या हप्त्याच्या रकमेची मागणी ग्रामपंचायतीने केली. जिल्हा परिषदेने कागदपत्रांत तांत्रिक अडचण दाखविली. घरकुले खासगी मालकाच्या जमिनीवर बांधली आहेत. त्यासाठी बक्षीसपत्र घेण्यात आले आहे. मात्र, येथील जमीन नवीन शर्तीची असल्याने त्याचे बक्षीसपत्र होऊ शकत नाही. झालेला करारनामा बेकायदा आहे. त्यामुळे येथे बांधलेल्या घरकुलांना निधी देता येत नाही. त्यामुळे या कामासाठी पुढील निधी न मिळाल्याने या घरांचे काम रखडले. घरे अपूर्णावस्थेत आहेत. जमिनीचे बक्षीसपत्र बेकायदा होते, तर त्याची आधीच छाननी अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे होते. मंजुरीनंतर अर्धवट काम झाल्यावर निधी थांबविणे योग्य नाही. घरकुले पूर्ण करण्यासाठी काहीतरी सुसंगत मार्ग काढून निधी मिळावा, अशी मागणी कातकरी बांधवांनी केली आहे.

Web Title: katkari family gharkul issue