Katraj Chowk Flyover : उड्डाणपुलाच्या मुदतीला 'कात्रजचा घाट'; काम पूर्ण होण्यासाठी २०२५ उजाडणार

२४ सप्टेंबर २०२१ मध्ये कात्रज चौकातील उड्डाणपूलाच्या कामाचे भूमीपूजन झाले. या घटनेला जवळपास दोन वर्षे होऊन गेली.
Katraj Chowk Flyover
Katraj Chowk FlyoverSakal

कात्रज - २४ सप्टेंबर २०२१ मध्ये कात्रज चौकातील उड्डाणपूलाच्या कामाचे भूमीपूजन झाले. या घटनेला जवळपास दोन वर्षे होऊन गेली. काम पुर्ण करण्याची मुदत २४ फेब्रुवारी २०२४पर्यंत असून ती दोन महिन्यावर आली आहे. मात्र, वेळेत काम पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने उड्डाणपुलाच्या मुदतीला प्रशासनाकडून कात्रजचा घाट दाखविल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.

आतापर्यंत पुलाचे केवळ ५० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामासाठी किमान एक ते दीड वर्ष लागणार आहे. त्यामुळे पुलावरुन वाहतूक सुरु होण्यासाठी २०२५ उजाडणार असल्याचे सध्याच्या संथगतीने सुरु असलेल्या कामावरुन स्पष्ट दिसत आहे.

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूलासोबत या कामाचे भूमीपूजन झाले. मात्र, त्या तुलनेत याठिकाणी कामाला गती दिलेली दिसत नाही. नवले पुलाकडून कोंढव्याकडे जाणारी वाहतूक कात्रज चौकात न येता ती थेट वंडरसिटी येथून उड्डाणपूलावरून माऊली गार्डनजवळ जाणार आहे.

वाहूतक पुलावरून गेल्यास पीएमपी बसथांबा किंवा कात्रज मंडईच्या आसपास किंवा सातारा रस्त्यावर आणि वंडरसिटीच्या बाजूने लागणाऱ्या वाहनांच्या रांगा कमी होतील. परिणामी, वाहतूकीचा प्रश्न मार्गी लागेल. मात्र, कामाला गती देण्याऐवजी रखडपट्टीच जास्त झाल्याचे दिसून येते.

संथ गतीने सुरु असलेल्या कामाचे खापर मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून महापालिकेवर फोडले जात आहे. राजस सोसायटी चौकातील भू-संपादन आणि इतर गोष्टीची कारणे सांगण्यात येत असली तरी प्रत्यक्षात मात्र, राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या जागा ताब्यात असलेल्या हद्दीतील पिलरवर कॅप टाकण्याचेही काम पूर्ण करण्यात अपयश आल्याचे दिसून येते.

असा असेल कात्रज चौकातील सहापदरी उड्डाणपूल

- एकूण निधी - १६९.१५ कोटी रुपये

- उड्डाणपुलाचा मार्ग - वंडरसिटी ते माऊली गार्डन

- उड्डाणपुलाची एकूण लांबी - १३२६ मीटर

- उड्डाणपुलाची रुंदी - २५.२० मीटर

- दोन्ही बाजूस ७ मीटर सर्व्हिस रस्ता

- वंडरसिटी ते कात्रज चौक ५.५ मीटर रुंद स्लीप मार्ग

अशी आहे उड्डाणपुलाची सद्यस्थिती

- कार्यारंभ आदेश - २५ फेब्रुवारी २०२२

- कामाची मुदत - २४ महिने

- कामाला आणखी लागणारा अंदाजे वेळ - १ वर्ष

- ८० टक्के स्लीपरोडचे काम पूर्ण

- एकूण पिलर कॅप २०पैकी १५ पूर्ण

- १९ गर्डरच्या गाळ्यांपैकी केवळ ४ गाळ्यांचे काम पूर्ण

- रॅम्पसाठी ६ हजार चौ.मी. पॅनल कास्टिंगची गरज त्यापैकी केवळ ५० टक्के काम पूर्ण

प्रतिक्रिया

उड्डाणपुलाच्या बाबतीत काम कमी आणि रखडपट्टीच जास्त झाल्याचे दिसून येते. कामाला गती नसल्याने हे काम वेळेत पूर्ण होत नाहीये. त्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

- सुनिल मांगडे, स्थानिक नागरिक

चौकात होणारी वाहतूककोंडीमुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. तसेच, काही पिलरची उंची खूप असल्याने वेळ लागत आहे. मात्र, आम्ही लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

- महेश पाटील, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com