कात्रज-कोंढवा रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा; चार वर्षांत १५ मृत्यू; २६ गंभीर जखमी | Road | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

katraj kondhawa road
कात्रज-कोंढवा रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा; चार वर्षांत १५ मृत्यू; २६ गंभीर जखमी

कात्रज-कोंढवा रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा; चार वर्षांत १५ मृत्यू; २६ गंभीर जखमी

कात्रज - कात्रज कोंढवा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. २०१८ मध्ये रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाल्यापासून कात्रज ते खडीमशीन चौक या साडेतीन किलोमीटरच्या मार्गात एकूण ३९ अपघात झाल्याची नोंद भारती विद्यापीठ आणि कोंढवा पोलिस ठाण्यात करण्यात आली. यामध्ये किरकोळ अपघातांची नोंद नाही. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी या रस्त्यांच्या रुंदीकरणाची आखण्यात आलेली योजना हवेतच विरली आहे.

कात्रज कोंढवा रस्त्यांवरील कात्रज चौक ते गोकुळनगर चौकापर्यंत भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनची हद्द येते. यामध्ये या २०१८ पासून एकूण २७ अपघातांची नोंद करण्यात आली. यामध्ये १२ जणांचा मृत्यू तर १७ जण गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे. त्याचबरोबर गोकुळनगर चौक ते खडीमशीन चौकांपर्यंत कोंढवा पोलिसांची हद्द येत असून यामध्ये २०१८ पासून एकूण १२ अपघातांची नोंद करण्यात आली. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे.

हेही वाचा: पुणेकरांना भरली हुडहुडी; राज्यातील सर्वाधिक निचांकी तापमानाची नोंद!

२०२० मध्ये निर्बंध असल्याने अपघातांची संख्या घटल्याचे कात्रज-कोंढवा रस्त्यांवरही पाहायला मिळाले. परंतु, २०२१ ला निर्बंध शिथिल झाल्याने रहदारी वाढण्यास सुरुवात झाल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचबरोबर रस्त्यांवर काही ठिकाणी पडलेली खडीही अपघातास कारणीभूत ठरत आहे. या रस्त्यावरून एका तासाला साधारणतः ७ ते ८ हजार वाहनांची वाहतूक होते. यामध्ये मोठ्या वाहनाचे प्रमाण लक्षणीय आहे. तर अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाणही जास्त असल्याचे दिसून येते.

रस्त्याचे काम वेळेत होणे अपेक्षित होते. हे काम वेळेत होत नसल्याने वाहतूक कोंडी तसेच अपघातांना सामोरे जावे लागत आहे. किरकोळ आणि मोठे अपघात रोजचेच ठरलेले आहेत, त्याबाबत गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

- पराग भेलके, रहिवासी, कात्रज-कोंढवा रस्ता परिसर

loading image
go to top