Katraj Zoological Museum : पुणेकरांना आता होणार झेब्र्याचे दर्शन

देशभरातून येणाऱ्या पर्यटकांना कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात वेगवेगळे व दुर्मिळ प्राणी पाहायला मिळावेत, यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.
Zebra
ZebraSakal

पुणे - देशभरातून येणाऱ्या पर्यटकांना कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात वेगवेगळे व दुर्मिळ प्राणी पाहायला मिळावेत, यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार आता झेब्र्याचा समावेश होणार असून युरोप, इस्राईल, आफ्रिकेत शोध सुरू आहे. त्यासाठी महापालिकेने एक कोटी सहा लाख रुपयांची निविदा काढली आहे.

कात्रजमध्ये १३० एकर जमिनीवर महापालिकेचे राजीव गांधी प्राणी संग्रहालय आहे. यामध्ये सर्पोद्यान, साळिंदर, बोनेट माकड, अस्वल, चितळ, सांबर, नीलगाय, चिंकारा, कोल्हा, वाघ, हत्ती, लांडगा, बिबट्या यांसह ६० प्रजातींच्या ४५० प्राण्यांचा समावेश आहे. या ठिकाणी सात वाघ आहेत. त्यात छत्रपती संभाजीनगरमधून अर्जुन आणि भक्ती, राजकोट येथून आणलेली पांढरी पट्टेरी वाघीण नागरिकांचे लक्ष वेधून घेते. यामध्ये आता वाढ करून झेब्रा, चौशिंग्या, तरस या प्राण्यांचा समावेश करणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने मान्यता दिली आहे.

झेब्रा हा अश्‍व वर्गातील प्राणी आहे. तो भारतामध्ये आढळत नाही. युरोप, आफ्रिका खंडासह इस्राईलमध्ये त्याचा अधिवास आहे. लहान मुलांसह मोठ्यांमध्येही झेब्र्याचे आकर्षण आहे. त्यामुळे त्याचा प्राणिसंग्रहालयात समावेश करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी पाच हजार चौरस मीटरचे खंदक तयार करण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, सुमारे एक कोटी रुपये खर्च आला आहे.

दोन जोड्यांचा समावेश

प्राणिसंग्रहालयात दोन मादी आणि दोन नर, अशा चार झेब्य्रांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यांचे वय साधारणपणे तीन ते चार वर्षे असणार आहे. पुण्यातील वातावरण झेब्य्रांसाठी पोषक आहे. भारतात सध्या म्हैसूर, चेन्नई, हैदराबाद, केवडीया येथील प्राणी संग्रहालयात झेब्रे आहेत.

दिवाळीत तरस, चौशिंग्या येणार

प्राणिसंग्रहालयात तरस आणि चौशिंग्या दाखल होणार आहेत. कर्नाटकातून तरस आणि छत्तीसगडमधून चौशिंग्या आणला जाणार आहे. त्यांची हस्तांतराची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. ते एक महिन्यात संग्रहालयात दाखल होतील, असे जाधव यांनी सांगितले.

योग्य संस्थेच्या माध्यमातून झेब्रे पुण्यात दाखल होतील. त्यांची वाहतूक आणि परवानगी घेण्यासाठी खर्च आहे. पुढील आठ ते नऊ महिन्यांत झेब्रे दाखल होतील.

- डॉ. राजकुमार जाधव, संचालक, राजीव गांधी प्राणी संग्रहालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com