#GyanGanesh कष्टाच्या रस्त्यावर ‘के. के.’चा महामार्ग

#GyanGanesh कष्टाच्या रस्त्यावर ‘के. के.’चा महामार्ग

पुणे - एक्‍स्प्रेस वेवरून जाताना के. के. ट्रॅव्हल्सच्या मोटारी, जीपसारख्या गाड्या वारंवार दिसत होत्या. विमानतळावरही त्यांची संख्या लक्षणीय होती. के. के. ट्रॅव्हल्स नावाची भानगड काय आहे हे बघूच, असे ठरविले. प्रत्यक्ष भेट झाली अन्‌ केदार कासार ऊर्फ ‘के.के.’च्या यशाचा ‘एक्‍स्प्रेस वे’ उलगडला. 

‘के.के.’च्या आज ६०० हून अधिक गाड्या पुणे-मुंबई मार्गावर धावत आहेत; तर नाशिक-मुंबई मार्गावरही ‘ऑपरेशन सुसाट’ आहे. सुमारे २०० हून अधिक असोसिएट्‌स, भागीदार आहेत. रिसॉर्ट, हॉटेल क्षेत्रातही त्याने पाऊल उचलले आहे. ही काही फार जुनी गोष्ट नाही...ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात व्यवसायाची संधी निर्माण करून त्यातून यश मिळविण्याची क्‍लृप्ती ‘के.के.’ने साधली आहे. १९८५ मध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केल्यावर ‘के.के.’ने सहकारनगरमध्ये गॅरेज सुरू केले. लूना, एम ५०, एम ८० गाड्यांची दुरुस्ती करता करता त्याने मारुती व्हॅन विकत घेतली. ट्रॅव्हल्सच्या व्यवसायासाठी तिचा वापर सुरू केला. कंपनीच्या अधिकाऱ्यांची वाहतूक करता करता ‘के.के.’ अनेकदा विमानतळावर गेला.

पुण्यातून मुंबईत विमानतळावर जाण्यासाठी सोयीचा एसटी, रेल्वे किंवा कॅबचा पर्याय नव्हता. मग त्याने भाडेतत्त्वावर एक बस घेतली. कोरेगाव पार्क भागात त्याची जाहिरात केली. रोज सायंकाळी साडेचार वाजता पुण्यातून निघायचा. मुंबईतून पहाटे साडेसहा वाजता पुण्यात यायचा. बस सेट झाली. संख्या वाढविली तरी विमानांच्या वेळा वेगवेगळ्या असल्यामुळे अडचणी येऊ लागल्या. मग शेअर कॅबची कल्पना त्याला २००७ मध्ये सुचली. ग्राहकांना एका विशिष्ट ठिकाणी बोलविण्यापेक्षा त्यांच्या घरी जाऊन त्यांना पिकअप केले तर..? या कल्पनेला अफलातून प्रतिसाद मिळाला अन्‌ के. के. ट्रॅव्हल्स हा मुंबई विमानतळाच्या प्रवासाचा ब्रॅंड झाला. 

वाटचाल सुरू आहे..!
घरी बोलावू तेव्हा गाडी येणार, आधुनिक तंत्रज्ञान असल्यामुळे एसएमएस, फिडबॅक, स्पीड गर्व्हरनर, सीसीटीव्ही कॅमेरे हे सगळे ओघाने आलेच. ग्राहकांशी नाते जोडण्यासाठी तंत्रज्ञानाचा फार उपयोग झाल्याचे के.के. सांगतो. आता मुंबईला जाण्यासाठी इकॉनॉमी, प्रीमियम, लक्‍झरी असे गाड्यांचे पर्यायही वाढविले आहेत. सुरवातीला गाडी चालविणारा के.के. आता कात्रजच्या ऑफिसमध्ये बसून जीपीएसच्या स्क्रिनवर पाहणी करतो. ग्राहक जपला पाहिजे, ही भावना उराशी घट्ट कवटाळली असल्यामुळे भरारी मारणाऱ्या ‘के.के.’चे पाय अजूनही जमिनीवर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com