केडगाव टोलबंदीचा विषय विधानसभेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

केडगाव - शिरूर-सातारा महामार्गावरील केडगाव (ता. दौंड) येथील टोलनाका बंद करण्याची मागणी आमदार राहुल कुल यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी याबाबत कार्यवाही करण्याचा आदेश दिला. 

केडगाव - शिरूर-सातारा महामार्गावरील केडगाव (ता. दौंड) येथील टोलनाका बंद करण्याची मागणी आमदार राहुल कुल यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी याबाबत कार्यवाही करण्याचा आदेश दिला. 

कुल म्हणाले की, रस्ते विकास महामंडळाने २००३ मध्ये केडगाव येथील लोहमार्गावर उड्डाण पूल बांधला. या उड्डाण पुलाची पथकर वसुलीची वाढीव मुदत २३ सप्टेंबर २०११ रोजी संपली होती. त्यानंतर पथकर वसुली झाली नसल्याचे कारण दाखवत वाढीव मुदत घेण्यात आली. २०११ मध्ये मुदत संपूनही महामंडळाने २३ सप्टेंबर, २०११ ते १६ एप्रिल, २०१८ या कालावधीसाठी नव्याने पथकर वसुलीचे आदेश दिले. आतापर्यंत अनेकवेळा या पथकर वसुलीस मुदत वाढवून देण्यात आली आहे. मुदतवाढीनंतर आता तरी टोल वसुली बंद होईल, अशी अपेक्षा होती. मात्र संबंधित विभागाने पुन्हा तीन वर्ष मुदतवाढीची निविदा प्रसिद्धीस दिली आहे. त्यामुळे हा मुदतवाढीचा प्रकार उघडकीस आला. पुन्हा तीन वर्षांची मुदतवाढ मिळाल्याने वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे हा टोल बंद व्हावा, यासाठी पुन्हा जोर वाढू लागला आहे. 

कुल म्हणाले, या पुलाबरोबर बांधण्यात आलेले दौंड, जेजुरी व फुरसुंगी येथील तीनही टोलनाके सरकारने बंद केले आहे. केडगाव येथील हा एकमेव टोलनाका सुरू आहे, हा टोलनाका बंद करण्याबाबत ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी वारंवार मागणी केली. पण, अजून तो बंद करण्यात आलेला नाही. टोलनाका बंद करण्याबाबत सरकारने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार कुल यांनी विधानसभेत केली. दरम्यान, टोलवसुलीची निविदा उघडण्याची तारीख रस्ते विकास महामंडळाने २५ जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. निविदा पुढे ढकलण्याचे कारण मात्र समजू शकले नाही.

खर्चाच्या चारपट वसुली
केडगावचा रेल्वे उड्डाण पूल बांधण्यासाठी सहा कोटी रुपये खर्च आला आहे. मात्र, त्यापेक्षा चारपट जास्त वसुली झाली आहे. पथकर वसुलीतून सरकारने सर्वसामान्य जनतेची लूट केल्याचा मुद्दा राहुल कुल यांनी विधानसभेत उपस्थित केला.

Web Title: Kedgaon Tollban Issue in Vidhansabha rahul kul