

केरळमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी
दावेदारांचे शक्तिप्रदर्शन सुरू
वेणुगोपाल, सतीशन, चेन्नीथला समर्थकांची मोर्चेबांधणी
तिरुअनंतपुरम, ता. ८ (पीटीआय) : केरळच्या मुख्यमंत्रिपदाची शर्यत आता रस्त्यावर अन् समाजमाध्यमांत पोहोचली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या प्रमुख दावेदारांच्या समर्थकांनी राज्यभर शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेंडू आता काँग्रेस श्रेष्ठींच्या कोर्टात असून, व्ही. डी. सतीशन, के. सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्नीथला यांच्या समर्थकांनी आपापल्या नेत्यांच्या समर्थनार्थ मोर्चेबांधणी केली आहे.
ऑल इंडिया काँग्रेस समितीचे (एआयसीसी) निरीक्षक मुकुल वासनिक आणि अजय माखन गुरुवारी तिरुवनंतपुरममध्ये दाखल झाले. त्यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) बैठकीत ६३ आमदारांशी वैयक्तिक चर्चा केली. यावेळी इंदिरा भवन परिसरात खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्या समर्थनार्थ सहा फ्लेक्स फलक लावण्यात आले होते. विशेष म्हणजे, वेणुगोपाल यांनी विधानसभा निवडणूक लढवलेली नाही. दरम्यान, तिरुवनंतपुरममधील वेणुगोपाल यांच्या एका फलकावर गुरुवारी शाई फेकण्यात आल्याचा प्रकारही समोर आला आहे.
दुसरीकडे, व्ही. डी. सतीशन यांच्या समर्थनार्थ राज्याच्या विविध भागांत निदर्शने करण्यात आली. अलाप्पुझा आणि कन्नूर जिल्ह्यातील इरिकूर येथे वेणुगोपाल यांच्या विरोधात आणि सतीशन यांच्या समर्थनार्थ पोस्टर्स लावण्यात आले आहेत. ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला फ्लेक्स युद्धात मागे असले, तरी समाजमाध्यमांवर त्यांचे समर्थक त्यांना मुख्यमंत्रिपद मिळावे यासाठी आग्रही मागणी करत आहेत. बहुतेक आमदारांचा पाठिंबा वेणुगोपाल यांना असल्याचे वृत्त असले, तरी पक्षाच्या नेत्यांनी अद्याप कोणतेही थेट वक्तव्य केलेले नाही. त्याऐवजी समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिक्रियांमधून अप्रत्यक्ष संकेत दिले जात आहेत. विधिमंडळ पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेण्याचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना दिले असल्याने, ही त्रिकोणी लढत निर्णयासाठी आता दिल्लीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
निरीक्षक शुक्रवारी आपला अहवाल ‘एआयसीसी’ला सादर करतील. त्यानंतर अंतिम चर्चेसाठी केरळमधील नेत्यांना दिल्लीत बोलावले जाण्याची शक्यता आहे. ‘यूडीएफ’मधील मित्रपक्षांनी व्ही. डी. सतीशन यांच्या नावाला पसंती दर्शवली असली, तरी त्यांनीही जाहीरपणे भाष्य करणे टाळले आहे. वट्टीयुरकावू मतदारसंघातील विजयी उमेदवार के. मुरलीधरन यांनी सांगितले, की मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित झाल्यानंतर संपूर्ण पक्ष त्या निर्णयाच्या पाठीशी उभा राहील. येत्या दोन दिवसांत बहुधा रविवारपर्यंत हा निर्णय जाहीर होईल. मी माझे मत निरीक्षकांकडे मांडले असून, पक्षश्रेष्ठी जनभावनेचा विचार करूनच योग्य निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, केवळ ‘फ्लेक्स बोर्ड’च्या आकारावरून मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.