

कासारगोड, ता. ८ (पीटीआय) : केरळमध्ये नुकत्याच लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर तिरुअनंतपुरम येथे झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) बैठकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठीचे माझे मत नोंदविले गेले नाही, असा दावा उदमा मतदारसंघाचे आमदार के. नीलकंठन यांनी शुक्रवारी केला. याप्रकरणी त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (एआयसीसी) निरीक्षकांकडे तक्रारही दाखल केली आहे.
गुरुवारी सीएलपी बैठकीनंतर बाहेर येताना एआयसीसी निरीक्षक मुकुल वासनिक यांच्या हातातील कथित यादीचा फोटो एका दैनिकाने प्रसिद्ध केल्यानंतर नीलकंठन यांनी ही तक्रार केली आहे. या यादीमध्ये काँग्रेस आमदारांची नावे आणि मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या पसंतीची नोंद असलेला स्तंभ असल्याचे वृत्त आहे.
संदीप वारियर, सजीव जोसेफ, टी. ओ. मोहनन, सनी जोसेफ, उषा विजयन आणि टी. सिद्दीक यांच्यासमोर ‘केसी’ अशी नोंद असल्याचे दिसून आले असून, त्याचा अर्थ मुख्यमंत्रिपदासाठी के. सी. वेणुगोपाल यांना पाठिंबा असा लावण्यात आला. आय. सी. बालकृष्णन यांच्या नावासमोर ‘केसी+आरसी’ अशी नोंद असल्याचे वृत्त आहे. ‘आरसी’चा संदर्भ ज्येष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांच्याशी जोडण्यात आला असून, तेही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील दावेदार मानले जात आहेत. मात्र, नीलकंठन यांच्या नावासमोरील जागा रिकामी राहिल्याचे वृत्त आहे.
पत्रकारांशी बोलताना नीलकंठन म्हणाले की, मुख्यमंत्रिपदासाठीच्या पसंतीबाबत त्यांनी एआयसीसी निरीक्षक वासनिक आणि दीपेंद्र सिंह माकन यांच्याकडे आपले मत व्यक्त केले होते. ‘‘मी तो फोटो पाहिला. माझी पसंती का नोंदवली गेली नाही, हे मला माहीत नाही. यासंदर्भात मी एआयसीसी नेते वासनिक आणि माकन यांना ई-मेल पाठवून तक्रार नोंदवली आहे,’’ असे ते म्हणाले. यामुळे पक्षनेते आणि जनतेमध्ये आपण एआयसीसी निरीक्षकांसमोर मत व्यक्त केले नाही, असा चुकीचा समज निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठी आपली पसंती कोणाला आहे, असे विचारले असता नीलकंठन यांनी माध्यमांसमोर नाव उघड करण्यास नकार दिला.
सध्या व्ही. डी. सतीशन, के. सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्निथला हे मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. सीएलपीने काँग्रेस अध्यक्षांना निर्णयाचा अधिकार देणारा ठराव मंजूर केल्यानंतर पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.