'देवभूमी' केरळला माणुसकीचे हात हवेत! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

"सकाळ'च्या (बुधवार पेठ, पुणे) कार्यालयामध्ये निधी स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे. सोमवारपासून (ता. 20) सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मदत निधी स्वीकारला जाईल. 

"देवभूमी' केरळचं सौंदर्य जणू शापित असावं, तसं कोसळत्या पावसानं आणि बेभान पुरानं तिथलं सारं उजाड झालं आहे. सव्वादोन लाख माणसांचा निवारा उडून गेला आहे; तर सव्वातीनशे माणसं दगावली आहेत. सुमारे साडेआठ हजार कोटींचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पावसाला अजूनही उतार नाही. हिरवीगार भातशेती पाण्यानं पोटात घेतली आहे. पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. लक्षावधी माणसं हालअपेष्टांनी घेरली आहेत. रुग्णालयांत जागा उरलेली नाही. केरळी माणसांच्या मदतीच्या हाकांत आणि आक्रोशांत त्यांचं भय आणि आकांत मिसळला आहे. सर्व पातळ्यांवर मदतकार्य सुरू असलं, तरी संकटाच्या मानानं ते अपुरं पडतं आहे. आपल्या सगळ्यांकडून केरळला तातडीनं मदत हवी आहे. या आपद्‌ग्रस्तांना उभं करण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी माणुसकीचे हात पुढं यायला हवेत. नैसर्गिक आपत्तींत धावून जाणाऱ्या "सकाळ रिलीफ फंडा'नं स्वतःची दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली असून, आपणास मदतीचं आवाहन करीत आहोत. 

"सकाळ'च्या (बुधवार पेठ, पुणे) कार्यालयामध्ये निधी स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे. सोमवारपासून (ता. 20) सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मदत निधी स्वीकारला जाईल. 

निधी प्रत्यक्ष देता येईल, टपालाने, चेक किंवा ड्राफ्टने पाठविता येईल. चेक किंवा ड्राफ्ट "सकाळ रिलीफ फंड' या नावाने असावेत.  वस्तू, कपडे अथवा अन्य कोणत्याही स्वरूपाचे साहित्य स्वीकारले जाणार नाही. 

"सकाळ रिलीफ फंडा'साठी निधी जमा करण्याची व्यवस्था "सकाळ'च्या वतीने अन्य कोठेही करण्यात आलेली नाही. "सकाळ रिलीफ फंडा'ला दिलेल्या देणग्या प्राप्तीकर कायद्याच्या "80 जी' कलमाखाली सवलतीस पात्र आहेत. 

सकाळ रिलीफ फंड 
द्वारा : "सकाळ' कार्यालय 
595 बुधवार पेठ, पुणे 411002 

 

Web Title: Kerala Floods Sakal Relief Fund for Kerala flood affected people