पुणे : पार्किंगचे वांदे; खडकवासला चौपाटीवर वाहतूक कोंडी

khadakwasla dam traffic problem parking issue
khadakwasla dam traffic problem parking issue

किरकटवाडी (पुणे) : एका बाजूला विक्रेत्यांच्या हातगाड्या आणि दुसऱ्या बाजूला पर्यटकांनी बेशिस्तपणे लावलेली चारचाकी व दुचाकी वाहने यामुळे पुणे-पानशेत रस्त्यावर खडकवासला धरण चौपाटीजवळ नेहमीच वाहतूक कोंडी होत असून, त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणार्‍या नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खडकवासला धरण चौपाटीवर शनिवार-रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. भेळ, पाणीपुरी, कांदा भजी, पालक भजी, भाजलेले मक्याचे कणीस, उसाचा रस, वडापाव असे वेगवेगळे खाद्यपदार्थ या ठिकाणी मिळत असल्याने पर्यटक आवर्जून आपली वाहने थांबवून त्याचा आनंद घेतात. मात्र खडकवासला धरण चौपाटीवर पार्किंगची कोणतीही व्यवस्था नसल्याने पर्यटकांच्या वाहनांचा रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या इतर वाहनांना अडथळा निर्माण होतो. परिणामी चौपाटीवर शनिवार,रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. काही बेशिस्त पर्यटक रस्त्याच्या मध्येच आपली वाहने लावून फिरण्यासाठी निघून जात असल्याने अगोदरच अरुंद असलेला रस्ता वाहतुकीसाठी कमी पडतो.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने खाद्यपदार्थ विक्रेते आपल्या हातगाड्या अगदी रस्त्याला लागून लावतात. त्या हातगाड्यांच्या पुढच्या बाजूला पूर्णपणे रस्त्यावर उभे राहून पर्यटक खाद्यपदार्थ विकत घेतात. येणारे पर्यटक घोळका करून रस्त्यावरून चालतात, काही तरुण-तरुणी हुल्लडबाजी करतात तर काही रस्त्यावरच उभे राहून फोटो काढतात. अशा अनेक बाबी खडकवासला धरण चौपाटीवर वाहतूक कोंडी होण्यास कारणीभूत ठरतात. याबाबत विक्रेत्यांसह येणाऱ्या पर्यटकांनीही काळजी घेणे आवश्यक आहे. अपघात होऊन एखाद्याचा जीव गेल्यावर उपाययोजना करण्यापेक्षा अगोदरच प्रशासनाने ही समस्या सोडवण्यासाठी योग्य पावले उचलणे आवश्यक आहे. या समस्येबाबत कायमस्वरूपीचा तोडगा काढण्याची मागणी खानापूरचे माजी सरपंच लाला जवळकर, सुशांत खिरिड, संतोष शेलार यांनी केली आहे.

खडकवासला धरण चौपाटी जवळ पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी जागा मिळावी म्हणून वनविभागाकडे अर्ज केलेला आहे. वनविभागाकडून परवानगी मिळाल्यास रस्त्याच्या बाजूला पार्किंगची व्यवस्था करता येऊ शकते. विक्रेत्यांकडूनही सुट्ट्यांच्या दिवशी वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी सुरक्षारक्षक नेमलेले असतात. काही बेशिस्त पर्यटक सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घालतात. खडकवासला गाव आता महानगरपालिकेच्या हद्दीत जात आहे, त्यामुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून खडकवासला धरण चौपाटीजवळ भव्य पार्किंगची व्यवस्था व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे.  
- सौरभ मते, सरपंच, खडकवासला

दोन वाहतूक पोलिसांसह काही होमगार्डचे जवानही वाहतूक नियोजनासाठी खडकवासला धरण चौपाटी जवळ तैनात असतात. वाहने व्यवस्थित लावण्यास सांगितल्यास सुशिक्षित पर्यटकच पोलिसांशी वाद घालतात. वाहतूक कोंडी झाल्यास त्याचा सर्वांनाच त्रास होतो. डी.आय.ए.टी गेट जवळ धरणाला लागून असलेल्या मोकळ्या जागेत मोठी पार्किंग व्यवस्था होऊ शकते.
-सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलिस स्टेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com