‘खडकवासला’तून विसर्ग वाढवला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सोमवारी सायंकाळी सहा वाजता मुठा नदीत पाच हजार १३६ क्‍युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता असून, नदीकाठच्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. 

पुणे - खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सोमवारी सायंकाळी सहा वाजता मुठा नदीत पाच हजार १३६ क्‍युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता असून, नदीकाठच्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. 

खडकवासला प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात आज दिवसभरात अर्धा अब्ज घनफूटने (टीएमसी) वाढ झाली. गेल्या दहा दिवसांपासून टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस होत आहे. त्यामुळे येवा वाढला असून, शनिवारी (ता.२७) सायंकाळपर्यंत खडकवासला प्रकल्पातील एकूण पाणीसाठा १८.११ टीएमसी होता. तो आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत २०.९७ टीएमसी (७१.९३ टक्‍के) झाला आहे. म्हणजेच गेल्या दोन दिवसांत पाणीसाठ्यात २.८६ टीएमसीने वाढ झाली आहे. या प्रकल्पातून पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासोबतच ग्रामीण भागात शेतीसाठी आवर्तन दिले जाते. 

भीमा खोऱ्यातील पाणीसाठ्यात वाढ 
भीमा खोऱ्यातील बहुतांश धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. कळमोडी, आंद्रा धरण भरल्यानंतर आता चासकमान पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. वीर, भाटघर आणि नीरा देवधर धरणांतील साठ्यातही चांगली वाढ होत आहे; परंतु घोड, विसापूर, पिंपळगाव जोगे आणि नाझरे या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे या धरणांत अद्याप पुरेसा पाणीसाठा 
नाही. 

धरणांतील साठा टीएमसीत (कंसात टक्‍केवारी) 
माणिकडोह ३.३१ (३२.५६), येडगाव १.१८ (४२.२२), वडज ०.५६ (४७.७८), डिंभे ८.०२ (६४.२३), घोड ०.२६ (४.८३), विसापूर ०.०१ (१.४१), कळमोडी १.५१ (१००), चासकमान ७.५२ (९९.२९), भामा आसखेड ५.७९ (७५.५३), वडिवळे ०. ९८ (९०.९५), आंद्रा २.९२ (१००), पवना ५.७५ (६७.५५), कासारसाई ०.४८ (८५.०६), मुळशी १३.११ (७०.९८), गुंजवणी २.८६ (७७.५७), नीरा देवधर ७.८८ (६७.१८), भाटघर १५.३८ (६५.४४), वीर ९.१० (९६.७६).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khadakwasla left the water