खडकवासला प्रकल्पामध्ये २२.५९ टीएमसी पाणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

मागील पाच दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने खडकवासला धरण साखळी क्षेत्रात मंगळवारी संध्याकाळी २२. ५९ टीएमसी म्हणजे ७७. ४९ टक्के पाणीसाठा झाला आहे. हे पाणी शहराला किंवा शेतीला वर्षभर पुरेल एवढे आहे.

खडकवासला - मागील पाच दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने खडकवासला धरण साखळी क्षेत्रात मंगळवारी संध्याकाळी २२. ५९ टीएमसी म्हणजे ७७. ४९ टक्के पाणीसाठा झाला आहे. हे पाणी शहराला किंवा शेतीला वर्षभर पुरेल एवढे आहे. 

शहराला दर महिन्याला दीड टीएमसी पाण्याची गरज असते. त्यानुसार, १२ महिन्यांचे १८ टीएमसी पाणी व उर्वरित चार टीएमसी पाणी दोन-तीन महिने पुरेल एवढे आहे. शेतीसाठी चार टीएमसीचे एक आवर्तन असते. यामध्ये, खरीप व रब्बी पिकांसाठी प्रत्येकी दोन, तर उन्हाळी एक, अशी पाच आर्वतने सोडली जातात. त्यासाठी एकूण २० टीएमसी पाण्याची आवश्‍यकता असते. 

गुरुवारी रात्री दहानंतर पावसाला सुरवात झाली. तो मंगळवारपर्यंत सुरू होता. गुरुवारी संध्याकाळी चारही धरणांत मिळून १५ टीएमसी पाणीसाठा जमा होता.

सोमवारी संध्याकाळी हा पाणीसाठा २२.५९ टीएमसी झाला म्हणजे ७.५९ टीएमसी पाणी जास्त जमा झाले. तसेच, गुरुवारपासून शेती व शहरासाठी शनिवारी रात्रीपासून सुमारे १.७० टीएमसी पाणी सोडले. दोन्ही मिळून एकूण ९.२९ टीएमसी पाणी पाच दिवसांत जमा झाले, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी दिली.

पानशेत, वरसगाव व टेमघर येथे मंगळवारी सकाळी सुमारे १५० मिलिमीटर पाऊस पडला. या धरणाच्या पुढे पडलेला पाऊस थेट खडकवासला धरणात जमा झाल्याने खडकवासला धरणाचा विसर्ग मंगळवारी सकाळी ५ हजारांपासून १४ हजार क्‍युसेकपर्यंत वाढविला, अशी माहिती शाखा अभियंता राजकुमार क्षीरसागर यांनी दिली.

खडकवासला धरण १० जुलैला १०० टक्के भरल्यानंतर कालव्यातून एक हजार क्‍युसेकने पाणी सोडण्यास सुरवात झाली. मागील २० दिवसांत धरणातून कालव्यात १.७० टीएमसी पाणी सोडल्याचे सहायक शाखा अभियंता बी. एम. भागवत यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khadakwasla Water Project Water Storage Rain