

केळी लागवडीसाठी
दर्जेदार कंद मिळेनात
-----
उतिसंवर्धित प्रति रोपांचे दर २१ ते १८ रुपये
-----
ॲग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः खानदेशात मृग बहर (जून व जुलैमध्ये लागवडीच्या बागा) केळीची लागवड सुरू आहे. परंतु दर्जेदार कंद मिळत नसल्याने लागवड रखडत सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांना जुनारी (काढणी ९७ ते ९८ टक्के पूर्ण झालेल्या बागा) आणि काढणी ९० टक्के पूर्ण झालेल्या पिलबाग/खोडवा केळी पिकातून कंद आणावे लागत आहेत.
खोडवा व जुनारी केळी बागांमधील कंद हवे तसे अंकुरत नाहीत. तसेच पुढे त्यांची निसवण, काढणी याबाबतही अडचणी असतात. यामुळे शेतकरी काढणी ६० ते ७० टक्के पूर्ण झालेल्या केळी बागांमधील कंद काढून त्यांची पुनर्लागवड करतात. परंतु कंदांचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांना कंदांसाठी इतर जिल्ह्यांतही जावे लागत आहे. अनेक शेतकरी मध्य प्रदेशातील बडवाणी, बऱ्हाणपूर, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, गुजरातमधील निझर किंवा तापी जिल्ह्यातूनही कंद आणत आहेत. उतिसंवर्धित रोपांची मागणीही आहे. परंतु रोपांचे दर २१ ते १८ रुपये प्रतिरोप असे आहेत. अनेक शेतकरी खर्च कमी करण्यासाठी रोपांचा उपयोग टाळून कंदांना पसंती देतात.
खानदेशात कमाल शेतकरी किंवा केळी उत्पादक नव्याने लागवडीसाठी काढणी सुरू असलेल्या उतिसंवर्धित बागांमधील ग्रॅण्ड नैन वाणाच्या कंदांना पसंती देत आहेत. तसेच काही शेतकरी सातमासी, आंबेमोहोर, श्रीमंती व इतर वाण निवडत आहेत. खानदेशात विविध वाणांचे कंद उपलब्ध आहेत. परंतु हे कंद जुनारी केळी बागांत अधिक आहेत. काढणी सुरू असलेल्या बागांतून शेतकरी कंद देण्यास नकार देत आहेत. यामुळे कंदांचा तुटवडा आहे.
चौकट ----
मोफत कंद अपवादानेच
कंदांची विक्रीही आता मोठा व्यवसाय खानदेशात बनला आहे. पूर्वी शेतकरी आपल्या बागांमधील कंद मोफत द्यायचे, परंतु आता मोफत कंद अपवादानेच मिळतात. अनेक शेतकरी एक ते सव्वा रुपया दर घेऊन कंद देत आहेत. तसेच गावोगावी कंद पुरवठादार, एजंटही कार्यरत आहेत. कंद काढण्याची मजुरी व इतर खर्चही लागतो. यामुळे प्रतिकंद दोन ते अडीच रुपये खर्च लागत आहे. यामुळे केळी लागवडीचा खर्च यंदा काहीसा वाढला आहे. कापूस, पपई पीक न परवडल्याने अनेक शेतकरी लागवडीकडे वळले असून यंदा लागवड काहीशी वाढेल, असेही दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.