खेड-शिवापूर टोलवरील गर्दी हटेना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

खेड-शिवापूर - पुणे-सातारा रस्त्यावर खेड-शिवापूर टोल नाक्‍यावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र टोलनाका असूनही येथील वाहनांची गर्दी काही हटत नाही. टोल प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रवाशांना सुटीच्या दिवशी या टोलनाक्‍यावर वाहनांच्या रांगांत अडकून मनस्ताप सहन करावा लागतो. अजून किती दिवस कोंडीचा सामना करायचा? असा सवाल प्रवासी विचारत आहेत. 

खेड-शिवापूर टोलनाक्‍यावर होणारी वाहनांची गर्दी कमी व्हावी, यासाठी दोन वर्षापूर्वी या टोलनाक्‍याशेजारीच दुसरा टोलनाका उभारण्यात आला. त्यानुसार साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी आणि पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी प्रत्येकी दहा मार्गिका उपलब्ध झाल्या. त्यानंतर काही काळ या टोलनाक्‍यावरील गर्दी हटल्याचे चित्र दिसत होते. मात्र काही दिवसांनंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे. शनिवार, रविवार आणि इतर सुटीच्या दिवशी सकाळच्या वेळी साताऱ्याकडे जाणाऱ्या टोलनाक्‍यावर आणि सायंकाळी पुण्याकडे जाणाऱ्या टोलनाक्‍यावर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र कायम पाहायला मिळते. या वाहनांच्या रांगेत प्रवाशांना सुमारे अर्धा तास ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे सुटीच्या दिवशी बाहेर फिरायला निघालेल्या नागरिकांना येथील वाहनांच्या रांगेत थांबावे लागल्याने मनस्ताप सहन करावा लागतो. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांत रस्त्यावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सुटीच्या दिवशी रस्त्यावर वाहनांची संख्या वाढल्याने टोलनाक्‍यावर वाहनांची गर्दी होते. तरीही आम्ही टोलवरील गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करतो, असे टोल प्रशासनाने सांगितले.

टोल प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना का नाही?
खेड-शिवापूर टोलनाक्‍यावर होणारी वाहनांची गर्दी हटावी, यासाठी या ठिकाणी नवीन टोलनाका उभारला आहे. मात्र, त्या ठिकाणी टोल प्रशासनाचे योग्य नियोजन नसल्याने टोलनाक्‍यावर सुटीच्या दिवशी हमखास वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे अजून किती दिवस आम्हाला या टोलनाक्‍यावरील वाहतूक कोंडीत थांबावे लागणार. सुटीच्या दिवशी या टोलनाक्‍यावरील वाहनांची गर्दी हटविण्यासाठी टोल प्रशासन कायमस्वरूपी उपाययोजना का करत नाही? असा संतप्त सवाल प्रवासी व्यक्त करत आहेत.

Web Title: Khed Shivapur Toll Naka Crowd Vehicle