रिक्षा चालकाच्या प्रसंगसावधानाने अपहरणाचा डाव उलटला

pune.jpg
pune.jpg

पुणे (लोणी काळभोर) : रिक्षा चालकाने दाखवलेले सतर्कतेमुळे वडकी (ता. हवेली) येथील सहा वर्षीय शाळकरी मुलाच्या अपहरणाचा डाव फसला असुन, रिक्षा चालकाच्या रुपात भेटलेल्या देवामुळे सहा वर्षीय मुलगा आई, वडीलांच्या कुशीत स्थिरावला आहे. ही घटना गुरुवारी (ता. 21) सांयकाळी सहा वाजताच्या सुमारास वडकी गावच्या हद्दीत घडली आहे. 

श्रीनाथ राहुल मोडक (वय- 6, रा. वडकी ता. हवेली) हे अपहरणाचा प्रयत्न झालेल्या मुलाचे असुन, सलीम शब्बीर शेख (रा. ससानेनगर, हडपसर) हे त्या रिक्षा चालकाचे नाव आहे. श्रीनाथचे वडील राहुल मोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात परप्रांतीय युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनाथ मोडक हा खऱाडी येथील व्हिक्टोरिया स्कुल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतो. श्रीनाथ हा गुरुवारी सांयकाळी साडेपाचच्या सुमारास घरासमोर खेळत असताना, एका परप्रांतीय युवकाने श्रीनाथला वडिलांनी बोलावले असल्याचे सांगत, श्रीनाथलाकडेवर बसवुन घऱाजवळुन दुर नेले.
 

श्रीनाथ व सदर अपहरकर्ता हांडेवाडी चौकात आले असता, अपहरणकर्त्याने पुणे स्टेशनला जाण्यासाठी सलीम शेख यांची रिक्षा निवडली. दरम्यान रिक्षात बसल्यावर, श्रीनाथने संबधित अपहरणकर्त्यास पप्पा कुठे आहेत असे मराठी भाषेत विचारण्यास सुरुवात केली. मात्र अपहरणकर्त्यास मराठी येत नसल्याने, श्रीनाथला पप्पा येतील असे हिंदीत सांगितले. सहा वर्षीय मुलगा मराठी बोलत असतांना, त्याला घेऊन जाणारा इसम मात्र हिंदीत बोलत असल्याने रिक्षा चालक यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली.

यावर सलीम यांनी मागे वळुन तात्काळ सदर अपहरणकर्त्याकडे त्याचे व मुलाचे नाते काय असा प्रश्न विचारला. यावर अपहरणकर्त्याने मुलगा पुतण्या असुन, लहानपणापासुन पुण्यातच राहत असल्याने त्याला हिंदी भाषा येत नसल्याची थाप मारली. मात्र या अपहरणकर्त्याच्या उत्तरामुळे सलिम यांचे समाधान न झाल्याने, हडपसर येथील भाजीमंडईजवळ रिक्षा थांबवली व मुलाच्या वडीलांना फोन लावुन दिल्याशिवाय रिक्षा पुढे नेणार नसल्याचे सलीम यांनी अपहरणकर्त्याला सांगितले. यावर हिंदी भाषिक अपहरणकर्त्याने फोन लावण्याचा खोटा बहाना करत रिक्षापासुन पळ काढला. सलिम यांना आरडाओरड करुन, अपहरणकर्त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजी मंडईजवळ गर्दी असल्याने, संबधित युवक पळुन जाण्यात यशस्वी ठरला. 

संबधित युवक पळुन गेल्यावर, सलिम यांनी श्रीनाथकडे विचारपुस केली असता श्रीनाथ याने आपली ओळख वडकी एवढीच सांगितले. यावर सलिम यांनी श्रीनाथला उरुळी देवाची येथील पोलिस चौकीत नेले. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजु महानोर यांनीही तात्काळ श्रीनाथचा पत्ता शोधुन, श्रीनाथला राहल मोडक व त्यांची पत्नी माधुरी यांच्या ताब्यात दिले. दरम्यान रिक्षा चालक सलीम शेख यांच्या प्रसंगसावधानमुळे श्रीनाथचे अपहरण फसले आणि श्रीनाथ आईवडीलाना मिळु शकला. सलिम शेख यांनी दाखवलेल्या प्रसंगसावधनेबद्दल सलिम शेख यांचा सत्कार हवेलीच्या पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. सई भोरे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. 

सलीम शेख यांना नवीन रिक्षा घेऊन देणार- श्रीनाथचे वडीलांची घोषणा.

दरम्यान, रिक्षा चालक सलीम शेख यांच्यामुळेच अपहरणकर्त्याच्या तावडीतुन श्रीनाथ परत मिळाला याचा आनंद राहल मोडक व त्यांची पत्नी माधुरी यांच्या डोळ्यात दिसुन आला. रोहुल मोड यांनी सलीम शेख यांना रोख रकमेचे बक्षिस देण्याचा प्रयत्न केला. मात्र सलिम यांनी रोख रक्कम स्विकारण्यास नकार दिला. यावर सलिम शेख यांना नवीन रिक्षा घेऊन देणार अशी घोषणा राहुल मोडक यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या समोर केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com