रोबोटच्या साह्याने मूतखड्यावर शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

पिंपरी - डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय व संशोधन केंद्रात अत्याधुनिक रोबोटच्या साहाय्याने मूतखड्यावर पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली.

पिंपरी - डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय व संशोधन केंद्रात अत्याधुनिक रोबोटच्या साहाय्याने मूतखड्यावर पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली.

आंबेगाव येथील ४० वर्षीय महिलेला दोन आठवड्यांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला एका मूत्रपिंडामध्ये ६ सेंटिमीटर आकाराचा काटेरी व शिंगांसारखा मुतखडा, तसेच दुसऱ्या मूत्रपिंडात लहान मुतखडा असल्याचे तपासणीअंती आढळले. त्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित होत नव्हते. वेदना होत असल्याने दुसऱ्या मूत्रपिंडामधील मुतखडा लेप्रोस्कोपिक सर्जरीद्वारे काढण्यात आला. पहिला मूत्रपिंडातील खड्याचा आकार मोठा असल्याने ते काढण्यासाठी रोबोटिक सर्जरीचा वापर करण्यात आला. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी शरीरामध्ये ५ मिलिमीटरची पाच छिद्रे करून तो बाहेर काढण्यात आला. हीच शस्त्रक्रिया नेहमीच्या पद्धतीने करण्यासाठी जादा चिरफाड करावी लागली असती. तसेच १५ सेंटिमीटरचा काप द्यावा लागला असता. त्याने संसर्ग होण्याची शक्‍यता होती. तसेच रक्तस्राव जास्त झाला असता. जुन्या पद्धतीने शस्त्रक्रिया केल्यावर रुग्णास आजारपणातून बरे होण्यास व जखम भरण्यास फार वेळ लागतो. हे सर्व टाळण्यासाठी रोबोटिक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व तपासण्या व ऑपरेशन योग्य झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

युरॉलॉजी विभागाचे डॉ. एस. पी. कांकरिया, डॉ. व्ही. पी. साबळे, डॉ. व्ही. पी. सावंत, डॉ. सुनील म्हस्के, डॉ. हिमेश गांधी, डॉ. दीपक माने, डॉ. अभिरुद्रा मुळे, डॉ. मेहुल सिंह तसेच निवासी डॉक्‍टर आणि भूलतज्ज्ञ विभागाचे डॉ. पी. एस. गरचा, डॉ. शीतल व डॉ. भूषण यांच्या निरीक्षणाखाली ही शस्त्रक्रिया झाली.

Web Title: kidney stone surgery by robot in d. y. patil hospital