esakal | किरीट सोमय्यांचा बारामती दौरा; जाणून घ्या त्यामागचं कारण
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit-Somaiya

किरीट सोमय्यांचा बारामती दौरा; जाणून घ्या त्यामागचं कारण

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती.

बारामती : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे गुरुवारी (ता. 9) बारामतीत येत आहेत. सोमय्या बारामतीत येणार म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी सोमय्यांच्या बारामती भेटीचे कारण वेगळे आहे.

सध्या किरीट सोमय्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी असलेल्या बजरंग खरमाटे यांना लक्ष्य केलेले आहे. त्यांच्या संपत्तीबाबत माहिती गोळा करण्यासाठी सोमय्या यांनी नुकतीच सांगली येथे भेट देत तेथे काही सेल्फीही काढलेले होते. खरमाटे यांनी बारामती तालुक्यातही काही मालमत्तांची खरेदी केल्याची माहिती किरीट सोमय्या यांच्यापर्यंत पोहोचलेली असून त्या बाबत अधिक माहिती घेण्यासाठी ते गुरुवारी बारामतीत येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी दिली. आमदार गोपीचंद पडळकर, बाळा भेगडे हेही त्यांच्यासमवेत असतील.

बारामती तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने ते मिळालेल्या माहितीची खातरजमा करुन घेणार असल्याचे मोटे यांनी स्पष्ट केले. सोमय्या येणार आणि तेही बारामतीत म्हटल्यावर साहजिकच पत्रकार परिषदही होणार असून सोमय्या आता बारामतीत काय तोफ डागणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा: सिंहगडाचा सर्वांगीण विकास आराखडा करण्याच्या वन विभागाला सूचना

अनिल परब व बजरंग खरमाटे यांच्यावर सोमय्या यांनी सध्या संपूर्ण लक्ष केंद्रीत केलेले असून येत्या काही दिवसात आणखी काही नेते ईडीच्या रडारवर येणार असल्याचे जाहीर करुन त्यांनी अगोदरच खळबळ उडवून दिलेली आहे. आता बारामतीत म्हणजेच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात येऊन सोमय्या नेमके काय बोलणार कोणावर काय आरोप करणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. गोपीचंद पडळकर व किरीट सोमय्या यांची बारामती भेट एकत्रित होत असल्याने त्यांच्या पत्रकार परिषदेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.

loading image
go to top