esakal | पोहण्यासाठी गेलेल्या किरकटवाडीतील मुलाचा बुडून मृत्यू; 2 दिवसांनंतर सापडला मृतदेह

बोलून बातमी शोधा

पोहण्यासाठी गेलेल्या किरकटवाडीतील मुलाचा बुडून मृत्यू; 2 दिवसांनंतर सापडला मृतदेह
पोहण्यासाठी गेलेल्या किरकटवाडीतील मुलाचा बुडून मृत्यू; 2 दिवसांनंतर सापडला मृतदेह
sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी: खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला कालव्यामध्ये मित्रांबरोबर पोहण्यासाठी गेलेल्या किरकटवाडी (ता.हवेली) येथील 13 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रणव विनोद सणस असे मृत मुलाचे नाव असून दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर आज मृतदेह नांदेड फाट्याजवळील पुलापासून काही अंतरावर कालव्यामध्ये तरंगताना आढळून आला. दिनांक 19 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास प्रणव त्याच्या इतर दोन मित्रांसोबत कालव्यामध्ये पोहण्यासाठी केला होता. सध्या दौंड,इंदापूर, हवेली या तालुक्यांसाठी खडकवासला धरणाच्या कालव्यातून पूर्ण क्षमतेने रब्बी पिकांसाठीचे आवर्तन सुरू आहे. पाण्याला वेग जास्त असल्याने व पोहता येत नसल्याने प्रणव पाण्यात बुडून काही क्षणातच दिसेनासा झाला.

हेही वाचा: पुण्यात आता देशीदारूही मिळणार घरपोच!

img

प्रणव विनोद सणस

याबाबत माहिती मिळताच हवेली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन नम घटनास्थळी दाखल झाले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला परंतु प्रणव सापडला नाही. आज दिनांक 20 एप्रिल रोजी सकाळपासूनच अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधकार्य सुरू केले. किरकटवाडीतील नागरिकही प्रणवचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाकडून शोधकार्य थांबवण्यात आले. मात्र किरकटवाडीतील तरुणांकडून प्रणवचा शोध सुरुच होता. शेवटी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास नांदेड फाट्याजवळील पुलापासून काही अंतरावर किरकटवाडीतील तरुणांना प्रणवचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. सदरची हद्द शहर पोलिसांकडे येत असल्याने सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारीही मृतदेह सापडलेल्या ठिकाणी आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास हवेली पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.

पालकांनी काळजी घेण्याचे पोलिसांचे आवाहन

कालव्यामध्ये बुडून मृत्यू होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे. तसेच सध्या कालव्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने कोणीही जीव धोक्यात घालून पोहण्यासाठी जाऊ नये असे आवाहन हवेली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन नम यांनी केले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आलेले असल्याने कोणीही कालव्यात पोहताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नम यांनी दिली आहे.