Kirkitwadi News : पोरांनो घरी सोडा रे! घराच्या मागं ओढा आणि जवळ एक देऊळ आहे, यापुढं मला काही सूचत नाही

मुलीकडे आलेल्या आजी रस्ता चुकून गेल्या दुसऱ्या गावात
Mankarani Shevale
Mankarani Shevalesakal

किरकटवाडी - सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास किरकटवाडी येथील महादेव मंदिराजवळ सुमारे सत्तर ते ऐंशी वयाच्या आजी रडत बसल्या होत्या. 'मी वाट चुकलेय रे, माझ्या लेकीकडं आले आहे. सकाळी देवळात गेले पाया पडायला आणि वाट चुकलेय.

माझ्या लेकीच्या घरामागं ओढा आणि जवळ एक लहान देऊळ आहे. जास्त काही माहिती नाही, मला घरी सोडा रे! लेक काळजी करीत असेल' असं म्हणत आजी रडता रडता रस्त्यावरुन ये-जा करणारांना विनवण्या करत होत्या.

आजींच्या रडण्याचा आवाज ऐकून जवळच राहणारे नरेंद्र हगवणे तेथे गेले व विचारपूस केली. रडणाऱ्या आजींना धीर दिला असता आजींनी मनकरणी रामचंद्र शेवाळे असे नाव सांगितले. आजी लेकीकडे आलेल्या असल्याने या भागात नवीन होत्या. तसेच वय झालेले असल्याने त्यांना घराचा पत्ता सांगता येत नव्हता. लेकीच्या घराच्या मागे ओढा आणि जवळ एक छोटं देऊळ आहे एवढीच खुण आजींना सांगता येत होती.

नरेंद्र हगवणे यांनी आजींना गाडीत बसवले व सांगितलेल्या खुणांच्या वर्णणाचे परिसरातील गावांतील ठिकाण शोधण्याचे ठरवले. किरकटवाडी गावातून मुख्य सिंहगड रस्त्यावर आल्यानंतर आजीने रस्त्याला लागून असलेल्या जयप्रकाश नारायण नगर येथील रामेश्वर मंदिराकडे बोट केले व इथंच मी पाया पडायला आले होते असे हगवणे यांना सांगितले

त्यानुसार हगवणे यांनी गाडी खाली जयप्रकाश नारायण नगर येथे नेली व बसलेल्या ज्येष्ठ नागरिकांकडे विचारपूस करत असताना आजींना सकाळपासून शोधत असलेले त्यांचे जावई संतोष रोकडे तेथे आले. जावई दिसल्यावर आजींचा जीव भांड्यात पडला व रडत असलेल्या आजींच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. आजी आणि त्यांचे जावई संतोष रोकडे दोघांनीही नरेंद्र हगवणे यांचे आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com