निसर्गपूजा ही संस्कृती - दत्तात्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

पुणे - ‘‘सध्या निसर्गाची होत असलेली हानी पाहायला धोरणकर्ते वेळेअभावी येऊ शकत नाहीत. अशा वेळी निसर्गातील समस्या आणि संवर्धनाचा मुद्दा समजावून घेण्यासाठी मला माहितीपटाद्वारे ते पटवून देणे सोपे वाटते. निसर्गपूजा हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग होता. निसर्ग आणि मानव संस्कृती यातील अद्वैत समजून काम करता आले तर सुवर्णमध्य साधता येईल,’’ असा आशावाद ज्येष्ठ माहितीपट निर्माते शेकर दत्तात्री यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला. 

बालगंधर्व रंगमंदिर येथे १३ व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन दत्तात्री यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. किर्लोस्कर ऑइल्स इंजिन्सचे कार्यकारी अध्यक्ष अतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते ‘किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या जलनियोजन समितीचे माजी अध्यक्ष प्रा. विजय परांजपे यांना ‘वसुंधरा जीवनगौरव सन्मान’, चित्रपटकर्ते गौतम पांडे यांना ‘वसुंधरा मित्र सन्मान’, पत्रकार राखी चव्हाण यांना ‘वसुंधरा पर्यावरण पत्रकार सन्मान’ आणि कार्यकर्त्या राहीबाई सोमा पोपेरे यांना ‘वसुंधरा मित्र’ सन्मानाने गौरविण्यात आले. वन्यजीव चित्रपटकार एस. नल्ला मुथ्थू, छायाचित्रकार सचिन राय, किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. देशपांडे, आरती किर्लोस्कर, महोत्सवाचे अध्यक्ष माधव चंद्रचूड, महोत्सवाचे आयोजक वीरेंद्र चित्राव आदी उपस्थित होते. 

चित्रपट महोत्सवाचा पहिला उद्‌घाटनाचा चित्रपट म्हणून नल्ला मुथ्थू यांचा ‘क्‍लॅश ऑफ टायगर्स’ आणि त्यापाठोपाठ दत्तात्री यांचा ‘फ्रॉम किलर रोडस्‌ टू ह्युमन हायवेज’ हा लघुपट दाखविण्यात  आला. 

दत्तात्री म्हणाले की, ‘‘गुजरात, कर्नाटक, नागालॅंड इथल्या अशा अनेक घटना आहेत की माहितीपटांमुळे तेथील पक्षी, वन्यजीव आणि निसर्गाचे संवर्धन झाले आहे. अनेकदा अज्ञानामुळे किंवा कमी वेळात जास्त पैसे कमाविण्यासाठी स्थानिक नागरिक अनवधानाने तिथल्याच स्थानिक पक्ष्यांची शिकार करतात. पण त्यामुळे होणारे नुकसान त्यांच्या लक्षात आणून दिल्यास तेच स्थानिक नागरिक निसर्गसंवर्धनासाठी पुढाकार घेतात.’’ प्रास्ताविक अतुल किर्लोस्कर यांनी केले. वीरेंद्र चित्राव यांनी महोत्सवामागील भूमिका विशद केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kirloskar Vasundhara International Film Festival inaugurated