कोंढरी येथे दरड पडण्याची शक्‍यतेने पस्तीस कुटुंबांना हलविले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

भोर महाड मार्गावरील कोंढरी (ता. भोर) येथील घरांवर डोंगराचा काही भाग (दरड) कोसळण्याची शक्‍यता असल्यामुळे प्रशासनाने गुरुवारी (ता. 8) गावातील 35 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. 

भोर (पुणे) : भोर महाड मार्गावरील कोंढरी (ता. भोर) येथील घरांवर डोंगराचा काही भाग (दरड) कोसळण्याची शक्‍यता असल्यामुळे प्रशासनाने गुरुवारी (ता. 8) गावातील 35 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. 

बुधवारी (ता. 7) दुपारी कुंडली गावातील भिवबा पारठे यांच्या घराच्या पाठीमागे डोंगराचा काही भाग कोसळला. सायंकाळी प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह गावास भेट दिली. माजी उपसभापती सुनील भेलके, धनंजय शिरवले, लक्ष्मण दिघे, सुधीर दिघे, विलास मादगुडे उपस्थित होते. दरड कोसळलेल्या ठिकाणचे भिवबा पारठे, चंद्रकांत मांढरे व सुरेश पारठे यांच्या कुटुंबांना सुरक्षित जागी स्थलांतरित केले. महसूल विभागाचे गाव कामगार तलाठी व मंडळाधिकारी यांना गावातच थांबण्याचे आदेश दिले. 

प्रांताधिकारी, पंचायत समिती, महावितरण, जलसंपदा, कृषी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, सह्याद्री रेस्क्‍यू फोर्सच्या जवानांसह कोंढरी गावात गेले. कोंढरी गावातील परिस्थितीची पाहणी करून 104 नागरिकांना शेजारच्या हिर्डोशी गावात स्थलांतर करण्यास सुरवात केली. सह्याद्री रेस्क्‍यू फोर्सच्या जवानांनी भर पावसात कोंढरीतील ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलांना हिर्डोशी गावच्या शाळेत सुखरूप पोचविले. गावातील जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी हलविले. 

नेटवर्क नसल्याने अडचणी 
अनेक नागरिकांनी आपल्या पाहुण्यांच्या घरी जाणे पसंत केले. गावात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे प्रशासनाला व्यवस्था करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत स्थलांतर करण्याचे काम सुरू होते. प्रशासनाने वेळेत लक्ष घातल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kondhari landslide