

कोरेगाव तालुक्याने काय घोडे मारले?
दुष्काळग्रस्त यादीतील समावेशासाठी ‘पाटण’संदर्भात निर्देश; मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक
पिंपोडे बुद्रुक, ता. ३ : दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांच्या यादीत समावेश न झाल्याने कोरेगाव तालुक्यात संतापाचे वातावरण असतानाच, आता अन्य १९ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचाली सुरू आहेत; परंतु त्यात पाटणचा समावेश केला जात असताना, कोरेगावने काय घोडे मारले आहे? असा उद्विग्न सवाल कोरेगावकर जनतेतून विचारला जात आहे.
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या पहिल्या अधिकृत यादीतून कोरेगाव तालुक्याला वगळल्याने सततच्या दुष्काळी परिस्थितीने पिचलेल्या येथील जनतेच्या मनात अन्यायाची भावना जोर धरू लागली आहे. त्यातच आता मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आणखी १९ तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्यासंदर्भात पाच प्रमुख पिकांचे २० टक्के सर्वेक्षण व ग्राऊंड ट्रथिंग करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील एकमेव पाटण तालुक्याचा समावेश आहे. त्यामुळे बळीराजा कमालीचा संतप्त झाला आहे.
महाबळेश्वर, सातारा आणि पाटण या तालुक्यांमध्ये कोरेगावच्या तुलनेत जादा पाऊसमान असूनही त्या तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्यासाठी प्रशासनाने कोणते निकष वापरले, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत, तर पालकमंत्र्यांच्या दबावामुळे पाटणची वर्णी लागल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
पावसाअभावी तालुक्यातील घेवडा, वाटाणा, सोयाबीन ही नगदी खरीप पिके पूर्णपणे वाळली. नफा तर सोडाच; पण ५० टक्के क्षेत्रावर हाती आलेली पिके काढणीचा खर्चही निघाला नाही. शेतीच्या पाण्याच्या टंचाईमुळे येथील परिस्थिती दर वर्षी अत्यंत बिकट झाली आहे. वसना उपसा जलसिंचन योजनेतील वंचित गावांची आर्थिक प्रगती खुंटली आहे. इथला पाणीप्रश्न निवडणुकीपुरताच पटलावर येतो आणि निवडून गेल्यावर लोकप्रतिनिधी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात, हाच आजवरचा इतिहास आहे.
पाण्याअभावी मजुरांना स्थलांतर करावे लागत आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुण कंत्राटी पद्धतीने शिरवळ, खंडाळा येथील कंपनीत राबत आहेत. अनेकांनी पुण्या- मुंबईला आश्रय घेतला आहे. दूध उत्पादकांवर चारा-पाण्याअभावी जनावरे विकण्याची वेळ आली आहे. स्वतः पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी २४ सप्टेंबरला घेवडा नुकसानीची पाहणी केली होती. शासनाने केवळ कागदावरील तांत्रिक निकष न पाहता प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करून कोरेगाव तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
................................................
भाजपचा आज सोळशीत
उत्तर कोरेगाव कार्यकर्ता मेळावा
सोळशी येथे उद्या (रविवार) सायंकाळी भाजपचा पक्ष प्रवेश आणि उत्तर कोरेगाव कार्यकर्ता मेळावा होत आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार सचिन पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या उपस्थितीत हा मेळावा होत आहे; परंतु तालुक्यात एकीकडे पिके वाया जाऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचा मेळावा होत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. मेळाव्यात उपस्थित राहणारे मंत्री आणि नेते कोरेगाव तालुक्यासाठी ठोस मदतीचा हात देणार, की घोषणेचा केवळ पाऊस पाडणार? वसना उपसा जलसिंचन योजनेतील उत्तर कोरेगावच्या वंचित गावांना हक्काचे पाणी देण्याबाबत ठोस काही सांगणार का, याबाबत उत्सुकता आहे.
...................................
पावसाने दगा दिल्यामुळे पिके डोळ्यांदेखत वाळून गेली. लागवडीचा आणि काढणीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. अशा बिकट स्थितीत सरकारने कोरेगाव तालुक्याला दुष्काळी यादीतून बाहेर ठेवून आमच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
- गणेश साळुंखे,
शेतकरी, पिंपोडे बुद्रुक.
.........................................
पहिल्या यादीत महाबळेश्वर आणि सातारा तालुके येतात, तर दुसऱ्या यादीत पाटणचा समावेश होतो, हा सगळा राजकीय खेळ आहे. पालकमंत्री केवळ पाटणचे आहेत का जिल्ह्याचे? त्यांना कोरेगावचा दुष्काळ दिसत नाही का? स्थानिक नेतृत्वाअभावी उत्तर कोरेगाववर सतत अन्याय केला जात आहे.
- प्रवीण सोळसकर,
ग्रामपंचायत सदस्य, सोळशी.
.........................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.