कोथरूड ते विमानतळ पुन्हा बससेवा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

पुणे - ‘कोथरूड ते लोहगाव विमानतळ’ ही बंद पडलेली पीएमपीची बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनाने या मार्गाचे फेरसर्वेक्षण करणार आहे. तसेच या मार्गात नवा भाग समाविष्ट करून ही बससेवा सुरू करण्याचे पीएमपीचे नियोजन आहे.

पुणे - ‘कोथरूड ते लोहगाव विमानतळ’ ही बंद पडलेली पीएमपीची बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनाने या मार्गाचे फेरसर्वेक्षण करणार आहे. तसेच या मार्गात नवा भाग समाविष्ट करून ही बससेवा सुरू करण्याचे पीएमपीचे नियोजन आहे.

पीएमपीने गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये लोहगाव विमानतळ ते कोथरूड आणि हिंजवडी ते लोहगाव विमानतळ ही बससेवा सुरू केली. त्यातील हिंजवडी मार्गावरील बससेवेला अजूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मार्गावर पीएमपी १८० रुपये प्रती व्यक्ती शुल्क आकारत आहे. या बसमध्ये सध्या ६० टक्के प्रवासी आहेत. मात्र, कोथरूड - विमानतळ मार्गावरील बसमध्ये प्रवाशांची संख्या पुरेशी नसल्यामुळे जुलैपासून ही सेवा बंद केली आहे. त्यासाठी पीएमपी १२० रुपये प्रती व्यक्ती शुल्क आकारीत होती. संबंधित ठेकेदाराला पीएमपीने नुकतीच नोटीस बजावली आहे. त्याचे स्पष्टीकरण करताना ठेकेदाराने प्रवाशांची संख्या अत्यल्प असल्याच्या नोंदी दाखविल्या होत्या. त्यामुळे या मार्गाचे फेरसर्वेक्षण करून बससेवा सुरू करण्याचे ठरविले आहे. त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

‘पुणे दर्शन’ला चांगला प्रतिसाद

पुणे दर्शनसाठी पीएमपी ५०० रुपये प्रतिव्यक्ती शुल्क आकारत आहे. या सेवेला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुट्याच्या हंगामात दोन ऐवजी ३- ४ बस दररोज सोडाव्या लागत आहेत. मात्र, प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी हेरिटेज टूर, औद्योगिक टूर, ग्रीन टूर, शैक्षणिक टूर आदींची संख्या मंदावली आहे. त्यासाठी फेरसर्वेक्षण करून निश्‍चित वेळापत्रक ठरविण्यात येईल, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले. विमानतळ आणि विशेष सहलींसाठी पीएमपीने १० नव्या एसी बस कंत्राटदाराला चालविण्यासाठी दिलेल्या आहेत.

Web Title: kothrud to airport bus service