कारभारी बदलले; परिस्थिती नाही

कारभारी बदलले; परिस्थिती नाही

पौड रस्ता - आचारसंहिता लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर कोथरूडमधील जनतेची प्रातिनिधिक मते अजमावली असता अनेकांनी आपल्या भावना तीव्र शब्दांत व्यक्त केल्या. कारभारी बदलले; पण परिस्थिती नाही, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

मेट्रोचे काम सुरू असलेल्या पौड रस्त्यावर रोज पाच बस बंद पडलेल्या दिसतात. यात महापालिकेच्या बस बरोबरच ठेकेदाराच्याही बसचाही समावेश आहे. एवढेच काय नव्याने आणलेल्या बसही भर चौकात बंद पडतात तेव्हा मात्र संताप अनावर होतो. स्मार्ट पुणे म्हणतो, पण काम मात्र वेंधळ्यांसारखे का वाटते, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते प्रीतम मेहता यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. मेहता म्हणाले की, ठेकेदाराला जर आपण चांगल्या बस देण्यासाठी पुरेपूर पैसे मोजतो तर ठेकेदाराच्या बससुद्धा खराब का मिळतात. अशा पद्धतीने कारभार होत असेल तर कारभारी बदलले पण परिस्थिती नाही, असेच म्हणावे लागेल. आम्हाला सरकार, प्रशासनाकडून स्मार्ट कारभाराची अपेक्षा आहे.

वाढत्या पुण्याच्या अपेक्षांची पूर्तता करण्याची समज आणि कुवत असणारा कारभारी आम्हाला हवा आहे. तो मिळत नाही हे आमचे दुर्दैव आहे. कारभारी बदलला पण परिस्थिती तीच आहे अशी भावना सामाजिक कार्यकर्ते सचिन धनकुडे यांनी व्यक्त केली. धनकुडे म्हणाले की, मेट्रोने पदपथावरच आपल्या थांब्याच्या पायऱ्या उभारल्या आहेत. त्यामुळे व्यावसायिकांना व्यवसाय करणे खूपच अवघड झाले आहे. मेट्रोमुळे विकास होईल असे म्हणताहेत पण आत्ता आहे ते व्यावसायिक व्यवसाय गुंडाळायच्या मनःस्थितीत आहेत. त्यावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

पोलिस मित्र संदीप कुंबरे म्हणाले की, वाहतुकीचे नियोजन पूर्णपणे ढेपाळले आहे. दशभुजा गणपती चौक ओलांडणे म्हणजे एक मोठे आव्हान असते. पौड फाटा ते एसएनडीटी कॉलेजपर्यंत जायला पदपथ नसल्याने पादचाऱ्यांनी चालावे कसे, याचा काहीही विचार कोणीही केलेला दिसत नाही. पादचाऱ्यांना चालण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असावी, ही सर्वांची मागणी आहे.

शिवाजी शेळके म्हणाले की, नळस्टॉप परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये ड्रेनेज तुंबण्याची समस्या आहे. येथील व्यावसायिकसुद्धा या त्रासाला वैतागले आहेत. महापालिकेचे अधिकारी मेट्रोवर तर मेट्रोवाले महापालिकेवर खापर फोडत आहेत. लोकांना प्रश्न सुटणे अपेक्षित आहे. एकमेकांवर जबाबदारी ढकलल्यावर जनतेने कोणाकडे दाद मागायची?

पथारीवाल्यांसदर्भात योग्य नियोजन होणे आवश्‍यक आहे. पथारीवाल्यांसाठी धोरण ठरवले असतानाही त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. पथारीवाल्यांना योग्य ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्यास पथारीवाले व सर्वसामान्य नागरिक यांचा त्रास कमी होईल.
- सुभाष आमले, सदस्य, पथारी व्यावसायिक संघटना

महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उपलब्धता पुरेशी नाही. त्याबद्दल चर्चा फक्त महिलादिनाच्या दिवशीच होते. सर्वसामान्य महिला असो की कामगार महिला आम्हा सर्वांना याबाबत असुविधा आहे. त्यावर विचार व्हावा.
- अनिता चव्हाण, गृहिणी

कै. बिंदुमाधव ठाकरे हे सहा मजली रुग्णालय उभारून आठ वर्षे झाली आहेत. परंतु अजूनही येथील फक्त एकच मजला वापरात आहे. या ठिकाणी सर्वोपचार केंद्र होणे अपेक्षित असताना येथील जागा खासगी संस्थेला देण्याचा घाट रचला आहे. त्याविरुद्ध मी आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. परंतु प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा आम्ही विचार करतो हे म्हणणे वा तशी जाहिरात करणे ही सर्वसामान्य जनतेची शुद्ध फसवणूक आहे.
- डॉ. अभिजित मोरे, वैद्यकीय व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com