भटक्‍या विमुक्त मुलींनी केले मंत्रोच्चार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

पिंपरी - शुद्ध मंत्रोच्चारात होमहवन करीत क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय उभारणीच्या कामाचे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी चिंचवडला दिमाखदार भूमिपूजन झाले. देशाच्या इतिहासातील पाऊलखुणा आणि क्रांतिकारकांचा अमूल्य ठेवा या वास्तूत संग्रहालयाच्या रूपाने पाहण्यास मिळणार आहे. 

पिंपरी - शुद्ध मंत्रोच्चारात होमहवन करीत क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय उभारणीच्या कामाचे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी चिंचवडला दिमाखदार भूमिपूजन झाले. देशाच्या इतिहासातील पाऊलखुणा आणि क्रांतिकारकांचा अमूल्य ठेवा या वास्तूत संग्रहालयाच्या रूपाने पाहण्यास मिळणार आहे. 

चिंचवडगाव येथील चापेकर वाड्यात (क्रांतितीर्थ) हा कार्यक्रम झाला. पुनरुत्थान समरसता गुरूकुलममधील भटक्‍या विमुक्त समाजाच्या ६ मुलींनी केलेले मंत्रोच्चार, दलित समाजातील पाच जोडपी आणि क्रांतिवीर बाळकृष्ण चापेकर यांचे पणतू राजीव चापेकर आणि पणतू सून अनुया चापेकर यांनी सुरवातीला होमहवन केले. त्यांच्या जोडीला पाच वैदिक होते. कार्यक्रमाला सर्वपक्षीय पदाधिकारी, राज्यभरातील विविध समाजातील व्यक्ती उपस्थित होत्या. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संग्रहालय इमारतीचे भूमिपूजन झाले. तसेच, चापेकर वाड्यातील क्रांतिवीर दामोदर चापेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर होमहवनात भाग घेतला. www.krantiveerchapekar.org या संकेतस्थळाचे त्यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. संग्रहालय इमारतीचे संकल्पचित्र व आराखड्याची पाहणी केली. देशभरातील वनवासी, आदिवासी समाजातील सुमारे ३५० क्रांतिकारकांची सचित्र माहिती, राजमाता जिजाऊ दालनातील महिला क्रांतिकारकांच्या दालनाची देखील त्यांनी पाहणी केली. जुलमी इंग्रज अधिकारी रॅण्डच्या वधानंतर क्रांतिवीर चापेकर बंधू यांना सुनावलेल्या शिक्षेच्या निकालाची प्रतही त्यांनी वाचली. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी त्यांना राज्य सरकारच्या ताब्यात असलेल्या क्रांतिवीर चापेकर बंधू यांच्या काही वस्तू संग्रहालयासाठी मिळाव्यात, अशी मागणी केली.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यासाठी आवश्‍यक सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. 

पालकमंत्री गिरीश बापट, क्रांतिवीर दामोदर चापेकर यांचे पणतू चेतन चापेकर, पणती जान्हवी जोशी, नात सून शालिनी व प्रतिभा चापेकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्ष ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र प्रांत संपर्कप्रमुख मिलिंद देशपांडे, प्रांत कार्यवाह विनायकराव थोरात, शहर कार्यवाह विलास लांडगे, विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी, हेमंत हरहरे, प्रकाश मिठभाकरे आदी उपस्थित होते. प्रभुणे यांच्यासह शकुंतला बन्सल, ॲड. सतीश गोरडे, रवींद्र नामदे, संजय कुलकर्णी आदींनी संयोजन केले. 

बलिदानाला आदरांजली
‘‘क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्मारकाला भेट देताना अत्यंत गौरवान्वित वाटत आहे. तेजाने तळपणाऱ्या युवांच्या बलिदानातून मिळालेले स्वराज्य सुराज्यात बदलणे हीच त्यांच्या बलिदानाला आदरांजली ठरेल’’, असा अभिप्राय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संग्रहालय इमारतीच्या भूमिपूजनानंतर चापेकर वाड्यातील नोंदवहीत नोंदविला.

Web Title: Krantiveer Chaphekar National Museum Bhumi Pujan