कुकडीत चौदा टीएमसी घट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

नारायणगाव - कुकडी प्रकल्पातून रब्बीच्या पहिल्याच आवर्तनात नियोजनापेक्षा जवळपास दुप्पट पाणी सोडल्याने कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणांची पाणीपातळी खालावली आहे. सलग साठ दिवस सोडलेल्या आवर्तनामुळे प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठ्यात तब्बल चौदा टीएमसी घट झाली आहे. 

नारायणगाव - कुकडी प्रकल्पातून रब्बीच्या पहिल्याच आवर्तनात नियोजनापेक्षा जवळपास दुप्पट पाणी सोडल्याने कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणांची पाणीपातळी खालावली आहे. सलग साठ दिवस सोडलेल्या आवर्तनामुळे प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठ्यात तब्बल चौदा टीएमसी घट झाली आहे. 

कुकडी प्रकल्पात आजअखेर ११ टीएमसी (३६.४३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गतवर्षी आजअखेर प्रकल्पात २७.३ टीएमसी (८९.८४ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कालव्यात सोडलेले जास्त पाणी यामुळे मागील पंचवीस वर्षांत प्रथमच सुमारे साठ दिवसांचे ऐतिहासिक जंबो आवर्तन सोडण्यात आले आहे. यामुळे कुकडी प्रकल्पाचे पाणी नियोजन ऐन दुष्काळात कोलमडणार आहे. याची झळ सात तालुक्‍यांना सोसावी लागणार आहे. या वर्षी २० ऑक्‍टोबर अखेर प्रकल्पाअंतर्गत येडगाव, माणिकडोह, वडज (ता. जुन्नर) व डिंभा (ता. आंबेगाव) या धरणात २५.८६ टीएमसी (८४.७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला होता. कालवा सल्लागार समितीची १० ऑक्‍टोबर व १३ ऑक्‍टोबर रोजी बैठक झाली होती.

प्रकल्‍पातील धरणनिहाय उपयुक्त पाणीसाठा
येडगाव - ०.४७६ टीएमसी (१७ टक्के), माणिकडोह - १.५०८ टीएमसी (१४.८१ टक्के), वडज - ०.५४ टीएमसी (४६.५५ टक्के), पिंपळगाव जोगे - १.४४ टीएमसी (३७ टक्के), डिंभे - ७.१५ टीएमसी (५७.३७ टक्के).

प्रकल्‍प दृष्टिक्षेपात
    जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा    या सात तालुक्‍यांना सिंचन व बिगर सिंचनासाठी लाभ होतो. 
    प्रकल्पाची उपयुक्त पाणी साठवण क्षमता ३०.५४ टीएमसी. 
    कुकडी प्रकल्पात आजअखेर ११ टीएमसी (३६.४३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक.

Web Title: Kukadi Dam Water Reduction