कुकडीचे नियोजन कोलमडणार?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

नारायणगाव - कुकडी प्रकल्पातून प्रथमच सुमारे पंचावन्न दिवसांचे आवर्तन सोडण्यात येत असल्याने प्रकल्पाचे पाणी नियोजन ऐन दुष्काळात कोलमडण्याची शक्‍यता आहे. यामुळे पुढील सहा महिने सात तालुक्‍यांत दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होणार आहेत. प्रकल्पातून मागील ४२ दिवसांत ७.८ टीएमसी पाणी सोडण्यात आले. कुकडी प्रकल्पात आज अखेर १४.९ टीएमसी (४८.८६ टक्के) नीचांकी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. 

कुकडी प्रकल्प जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या सात तालुक्‍यांना वरदान ठरला आहे. प्रकल्पाची उपयुक्त पाणीसाठवण क्षमता ३०.५४ टीएमसी आहे. पाऊस कमी झाल्याने २० ऑक्‍टोबरअखेर प्रकल्पांतर्गत येडगाव, वडज, माणिकडोह, वडज (ता. जुन्नर) व डिंभा (ता. आंबेगाव) या धरणांत २५.८६ टीएमसी (८४.७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत वीस ऑक्‍टोबरपासून चाळीस दिवसांत रब्बीसाठी एकूण ६.२ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला.

त्यानुसार २० ते २४ ऑक्‍टोबरदरम्यान प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले. त्यानंतर २५ ऑक्‍टोबरपासून कुकडी डावा, पिंपळगाव जोगा, डिंभा उजवा कालव्यात पाणी सोडण्यात सुरवात करण्यात आली. आजअखेर कुकडी प्रकल्पातून एकूण ७.७९ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. झालेल्या नियोजनापेक्षा कालव्यात १.३९ टीएमसी पाणी जास्त सोडण्यात आले आहे. पंधरा डिसेंबरपर्यंत आवर्तन सुरू राहणार आहे. आवर्तन पूर्ण झाल्यानंतर १५ डिसेंबर अखेर प्रकल्पात जेमतेम बारा टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. यामुळे पुढील सहा महिने सात तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.  

जेमतेम एक आवर्तन शक्‍य...
कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार पाण्याचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य पाटबंधारे विभागाला दिले असते, तर दुष्काळात उपलब्ध पाण्याचे काटकसरीने नियोजन करून रब्बीची दोन व उन्हाळी एक अशी तीन आवर्तने देणे शक्‍य होते. रब्बीच्या पहिल्याच आवर्तनात सुमारे अकरा टीएमसी पाणी द्यावे लागणार आहे. प्रकल्पीय शिल्लक पाणीसाठा पाहता आता पुढील काळात जेमतेम एक आवर्तन देणे शक्‍य होणार असल्याची माहीती पाटबंधारे विभागाचे अधिकारी देत आहेत.

Web Title: Kukadi Project Water Management