Garbage Depot Issue : कुंजीरवाडी येथील कचरा डेपो स्थलांतराचा प्रश्न अखेर सुटला; विद्यार्थिनीने केलेल्या लाक्षणिक उपोषणाला यश

कुंजीरवाडी येथील कचरा डेपो स्थलांतराचा प्रश्न अखेर सुटला.
Girl Student Fasting
Girl Student FastingSakal

उरुळी कांचन - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील ग्रामीण सर्वागीण विकास विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या दोनही शाळांना लागूनच कुंजीरवाडीचा कचरा डेपो असून हा कचरा डेपो स्थलांतरित व्हावा, अशी मागणी ग्रामस्थ आणि, विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक, कर्मचारी ग्रामपंचायतीकडे गेली दहा वर्ष करत होते.

मात्र कचरा डेपो स्थलांतरावर कोणताही तोडगा निघत नव्हतो शेवटी सातवीचे शिक्षण घेणारी आदिती ज्ञानेश्वर सावंत या विद्यार्थिनीने पुढाकार घेऊन शुक्रवारी (ता. १) सकाळी आठ वाजता ग्रामपंचायत समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली. तिला सहकार्य करण्यासाठी सर्वच विद्यार्थी आदिती सोबत ग्रामपंचायत समोर बसले होते. दुपारी ग्रामपंचायत प्रशासनाने कचरा डेपो स्थलांतर करण्याचे जाहीर केल्यानंतर आदितीने उपोषण सोडले.

दरम्यान, कुंजीरवाडी गावची एकूण लोकसंख्या २५ ते ३० हजार आहे. येथे नर्सरी व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने परप्रांतीय मजुरांची संख्या जास्त आहे. या मजुरांची मुले येथील ग्रामीण सर्वागीण विकास माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत. ही शाळा म्हातोबा आळंदी रोड लगत आहे.

धुमाळ मळा, पान मळा, थेऊर फाटा, पेठ, नायगाव या परिसरातील मुले देखील या शाळेत शिक्षण घेत आहेत. सध्या जिल्हा परिषद शाळेत एकूण पाचशे पन्नास विद्यार्थी शिक्षण घेत असून माध्यमिकची एकूण आठशे तेवीस विद्यार्थी संख्या आहे. कुंजीरवाडी गावातील वाॅर्ड क्रमांक सहामध्ये ही शाळा येते. अंगणवाडी, जिल्हा परिषदेची १ ते ४ पर्यंतची शाळा तसेच ५ ते १० पर्यंतची माध्यमिक शाळा आहे.

शाळेलगत मुलांना जेवण्यासाठी शाळेचे गार्डन आहे. आणि गार्डन शेजारीच कचरा डेपो आहे. वाऱ्याने कचरा या गार्डनमध्ये सर्वत्र पसरत आहे. कचरा जाळला की धुराचे लोट शाळेतील वर्गखोल्यात येतात. या धुरामुळे विद्यार्थ्यांना मळमळ, डोकेदुखी, चकर, उलट्या असे प्रकार होण्यास सुरुवात होत आहे. ग्रामपंचायत सदस्यांमधील आपापसातील राजकारणामुळे कचरा डेपो स्थलांतराच्या विषयाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

कुंजीरवाडी गावात दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो व पंचक्रोशीतील अनेक व्यापारी, शेतकरी भाजीपाला घेऊन विकण्यासाठी गावात येतात. नायगाव, सोरतापवाडी, पेठ, आळंदी म्हातोबा, थेऊर अशा गावांची प्रमुख बाजारपेठ ही कुंजीरवाडी गाव आहे. गावालगत २० ते २५ मोठी हॉटेल आहेत. गावातील एकूण सहा वाॅर्ड मधील ओला सुका कचरा आणि गावालगत असणाऱ्या हॉटेल मधील उरलेले अन्न घंटा गाडीच्या माध्यमातून शाळेजवळील कचरा डेपो येथे येऊन टाकला जातो.

ग्रामपंचायत कुंजीरवाडीने कचरा उचलण्याबाबतचे अंदाजपत्रक केले असून अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता घेऊन २४ नोव्हेंबर २०२३ रोजी ऑनलाईन निविदा प्रक्रिया केलेली आहे. ही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सोमवारी (ता. ४) कचरा उचलण्यास सुरुवात केली जाणार आहे. कचरा डेपो स्थलांतराच्या प्रश्नाबाबत ग्रामपंचायत गंभीर आहे. सदर कामाची कार्यवाही वेगाने चालू आहे. तसेच सदर कचरा टाकण्यासाठी गोरख घुले यांनी त्यांचे चार एकर क्षेत्र तात्पुरत्या स्वरूपात ग्रामपंचायत प्रशासनाला उपलब्ध करून दिले आहे.

- सविता भुजबळ, ग्रामविकास अधिकारी, कुंजीरवाडी (ता. हवेली)

कुंजीरवाडी येथील ग्रामीण सर्वागीण विकास विद्यालय या शाळेत मी सातवीचे शिक्षण घेत आहे. आमच्या शाळेच्या शेजारीच कचरा डेपो आहे. या कचरा डेपोतील कचऱ्यातून प्रचंड दुर्गंधी येते. कचरा पेटून दिल्यास वर्गात धूर येतो. त्यामुळे खूपच त्रास होतो. मळमळ, डोकेदुखी, चकर, उलट्याचा त्रास होतो. या कचऱ्यावर भटकी कुत्री येतात. ते हल्ला करण्याची भीती वाटते. शाळेत मिळणारा आहार खाताना जेवणावर माश्या बसतात. कचरा डेपो येथून हलवावा या मागणीसाठी मी उपोषणाला बसले होते. ग्रामपंचायत कचरा उचलण्यास लवकर सुरुवात करणार असल्याचे निवेदन मला दिले असल्यामुळे मी उपोषण मागे घेतले आहे.

- आदिती सावंत, विद्यार्थिनी, ग्रामीण सर्वागीण विकास विद्यालय, कुंजीरवाडी (ता. हवेली)

कचरा डेपो प्रोसिसिंग प्लांट होईपर्यत कचरा साठविण्यासाठी माझे चार एकर क्षेत्र विनामोबदला उपलब्ध करून दिले आहे. या प्रश्नावर तोडगा निघत नव्हता त्यामुळे पळवाट शोधण्यापेक्षा ती जबाबदारी स्वीकारली. माझे क्षेत्र लोकवस्तीपासून लांब आहे. या कचरा डेपोमुळे स्थानिक नागरिक, शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सध्या दोन हजार विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. या कचरा डेपोमुळे त्यांचे भविष्यच अंधारात आहे. नागरिकांनी जागरूक होऊन कचरा टाकताना ओला आणि सुका असं वर्गीकरण करावं. म्हणजे भविष्यात याचा त्रास आपल्या येणाऱ्या पिढीला होणार नाही.

- गोरख अरुण घुले, शेतकरी, कुंजीरवाडी (ता. हवेली)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com