लाडशाखीय वाणी अर्थव्यवस्थेचा कणा

मारुंजी - उपस्थितांना अभिवादन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, आर. एल. वाणी, कैलास वाणी यांच्यासह अन्य पदाधिकारी.
मारुंजी - उपस्थितांना अभिवादन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, आर. एल. वाणी, कैलास वाणी यांच्यासह अन्य पदाधिकारी.

पुणे - देशातील व्यापार-उद्योगाच्या वाढीत लाडशाखीय वाणी समाजाचे मोठे योगदान आहे. या समाजाने रोजगाराच्या संधी निर्माण करून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. हा समाज देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या पाठीशी सरकार उभे राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. समाजातील विद्यार्थ्यांसाठी पुणे आणि नाशिक येथे वसतिगृहासाठी जागा देण्यात येईल, असेही आश्‍वासन त्यांनी या वेळी दिले.
लाडशाखीय वाणी समाजाच्या वतीने मारुंजी येथे आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या उद्‌घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडे, आमदार मेधा कुलकर्णी, स्वागताध्यक्ष आर. एल. वाणी आदी या वेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, लाडशाखीय वाणी समाज हा संघर्षातून पुढे आलेला समाज आहे. या समाजाने स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिले असून, शिक्षणातही अग्रणी आहे. पुणे आणि नाशिक शहरात विद्यार्थ्यांसाठी पाचशे खोल्यांचे वसतिगृह बांधण्याचा समाजाचा मानस आहे. त्यासाठी सरकारकडून जमीन उपलब्ध करून देण्यात येईल. 

या कार्यक्रमात अनावरण झालेल्या वाणी चेंबर ऑफ कॉमर्सचा दर्जा जागतिक पातळीवरचा होईल, अशाही शुभेच्छा त्यांनी दिल्या. समाजाची माहिती देणाऱ्या ‘समाजमंथन’ या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले.
प्रास्ताविकात कार्याध्यक्ष कैलास वाणी यांनी या समाजाच्या प्रगतीची माहिती दिली. व्यापारी आणि सुसंस्कृत असलेला हा समाज विविध क्षेत्रांत प्रतिनिधित्व करीत आहे. समाजाकडून दुष्काळग्रस्त भागातील २५ ते ३० गावे दत्तक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या महाधिवेशनास श्‍याम शेंडे, गोपाळराव केले, अभय नेरकर, अभय केले, अनिल चितोडकर, जगदीश चिंचोरे, राजेश कोठावळे, शशिकांत वाणी, गजानन भालपुरे यांच्यासह अन्य प्रतिनिधी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री निधीसाठी ११ लाख
लाडशाखीय वाणी समाजाच्या वतीने या वेळी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

पण तुम्ही मात्र वेगळे आहात...
समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृह उभारणीसाठी सरकारने आम्हाला जागा द्यावी. त्याच्या बांधकामासाठी लागणारा निधी आमचा समाज उपलब्ध करून देईल, अशी विनंती कैलास वाणी यांनी केली. त्या वेळी ‘बऱ्याचदा विविध समाजाची लोकं आमच्याकडे येतात. ते जागेबरोबरच निधीचीही मागणी करतात. पण तुम्ही मात्र वेगळे आहात हो...’ अशा शब्दांत फडणवीस यांनी लाडशाखीय वाणी समाजाचे कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com