लक्ष्मीपूजनाचे साहित्य खरेदीसाठी झुंबड  | Diwali Festival 2019

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

 Diwali Festival 2019 : पुणे : दिवाळीत लक्ष्मीपूजन महत्त्वाचे मानले जाते. त्यासाठी वस्तू, पूजेच्या साहित्यखरेदीसाठी शनिवारी बाजारात गर्दी झाली. रविवारी (ता. 27) लक्ष्मीपूजन आहे. त्यासाठी पंचांगकर्त्यांनी सायंकाळी सहा ते रात्री साडेअकरापर्यंत मुहूर्त सांगितलेला आहे.

 Diwali Festival 2019 : पुणे : दिवाळीत लक्ष्मीपूजन महत्त्वाचे मानले जाते. त्यासाठी वस्तू, पूजेच्या साहित्यखरेदीसाठी शनिवारी बाजारात गर्दी झाली. रविवारी (ता. 27) लक्ष्मीपूजन आहे. त्यासाठी पंचांगकर्त्यांनी सायंकाळी सहा ते रात्री साडेअकरापर्यंत मुहूर्त सांगितलेला आहे. 

पूजनासाठी लक्ष्मीची मूर्ती, बोळकी, साळीच्या लाह्या, बत्तासे आदी साहित्यखरेदीसाठी नागरिक शनिवारी बाहेर पडले होते. घर, दुकान, कार्यालयांत लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू होती. मंडई, मार्केट यार्ड, पौड रस्ता, सिंहगड रस्ता, धनकवडी, बिबवेवाडी आदी भागांत लक्ष्मीपूजनाच्या साहित्यविक्रीचे स्टॉल सजले होते. तसेच, झेंडूसह विविध फुलांची खरेदी ग्राहक करीत होते. शेवंती, झेंडू आदी फुलांची रास विक्रेत्यांनी रचली होती. तोरण आणि हार लक्ष वेधून घेत होते. लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज सलग असल्याने मिठाईच्या दुकानांमध्येही खरेदीसाठी गर्दी होती. 

लक्ष्मीपूजनाबरोबरच वही वा चोपडीपूजनालाही व्यापाऱ्यांमध्ये महत्त्व आहे. त्यामुळे वह्याखरेदीबरोबरच दुकानांच्या स्वच्छतेची कामे सुरू होती. घरांप्रमाणे दुकानांमध्येही सजावट आणि रोषणाईच्या कामाची लगबग सुरू होती. 

पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले की, या वर्षी 28 तारखेला सोमवारी अमावास्यासमाप्ती सकाळी नऊ वाजून नऊ मिनिटांनी आहे. प्रतिपदेचा क्षय झाल्याने या वर्षी पाडव्यानिमित्त केली जाणारी पूजा सोमवारच्या पहाटेपासून नेहमीप्रमाणे करता येते. ब्रह्ममुहूर्तापासून केले जाणारे दैविक, धार्मिक कार्य हे पुढील इष्ट दिवसासाठी ग्राह्य असते. त्यामुळे पाडव्याची पूजा सकाळी नऊनंतर करायला पाहिजे, असे नाही. नेहमीप्रमाणे पाडव्याच्या पहाटेपासून पाडव्याची पूजा करावी. 
 
पूजनासाठी मुहूर्त 
- लक्ष्मीपूजन (27 ऑक्‍टोबर) : सायं. 6 ते रात्री 11.30 पर्यंत 
- वहीपूजन (28 ऑक्‍टोबर) : पहाटे 1.50 ते 3.30, पहाटे 5.30 ते सकाळी 8, सकाळी 9.30 ते 11 वाजेपर्यंत 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lakshmi Pujan shopping for Diwali Festival 2019